• Fri. Jul 17th, 2026
    Success Story : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, बारामतीच्या लेकीची देशात झेप; मुलींमध्ये ऑल इंडिया रँक-1

    बारामतीच्या लेकीने नीटच्या परीक्षेत देशात मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. बारामतीची विद्यार्थिनी श्रावणी कृष्णा कुदळे हिने नीट परीक्षेत ७२० पैकी ७१० गुण मिळवले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपक पडकर, बारामती : देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या आणि स्पर्धात्मक वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या नीट (युजी) २०२६ मध्ये बारामतीच्या कन्येने ऐतिहासिक कामगिरी करत संपूर्ण राज्याची मान उंचावली आहे. श्रावणी कृष्णा कुदळे हिने ७२० पैकी तब्बल ७१० गुण मिळवत ऑल इंडिया रँक (एआयआर) ५ क्रमांक पटकावला आहे. एवढेच नव्हे, तर देशातील सर्व मुलींमध्ये प्रथम क्रमांक, ओबीसी (एनसीएल) प्रवर्गात ऑल इंडिया रँक-१ आणि महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवत तिने यशाचा नवा उच्चांक गाठला आहे.

    श्रावणीला ९९.९९ टक्के

    श्रावणीच्या या दैदिप्यमान यशामुळे बारामतीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिक्षण क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, तिचे आई-वडील दोघेही पुणे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या शिक्षक दाम्पत्याच्या घरातील मुलीने देशपातळीवर मिळवलेले हे यश शासकीय शिक्षण व्यवस्थेसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. श्रावणीने ९९.९९ टक्के मिळवले आहेत. अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमधून अव्वल पाचमध्ये स्थान मिळवणे ही मोठी कामगिरी मानली जाते.

    श्रावणीच्या जिद्दीला यश

    श्रावणीच्या यशामागे सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे काटेकोर नियोजन, पालकांचे मार्गदर्शन आणि शिक्षकांचे मोलाचे सहकार्य असल्याचे सांगितले जात आहे. शिक्षक असलेल्या आई-वडिलांनी शिक्षणाचे महत्त्व लहानपणापासूनच तिच्या मनावर बिंबवले. त्याच संस्कारांच्या बळावर श्रावणीने वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवण्याच्या स्वप्नाला यशाचे पंख दिले. राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी श्रावणीचे यश प्रेरणादायी ठरले आहे. मेहनत आणि जिद्दीच्या बळावर राष्ट्रीय स्तरावरही सर्वोच्च यश मिळवता येते, हे तिने सिद्ध करून दाखवले आहे.

    श्रावणीला बायोलॉजीमध्ये पैकीच्या पैकी

    वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचे श्रावणीचे ध्येय असल्याचे तिने सांगितले. तिच्या यशामुळे महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांची परंपरा पुन्हा एकदा देशासमोर ठळकपणे अधोरेखित झाली आहे. श्रीवणीने 720 पैकी 710 मार्क मिळवले आहेत. विशेष म्हणजे तिला बायोलॉजीमध्ये 360 पैकी 360 मार्क मिळाले आहेत. तर केमिस्ट्रीमध्ये 180 पैकी 175 आणि फीजिक्स 180 पैकी 175 मार्क मिळाले आहेत. श्रावणीला मिळालेल्या या यशानंतर तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

    श्रावणीवर शुभेच्छांचा वर्षाव

    जिद्द आणि चिकाटी असेल, त्याचबरोबर सातत्याने काम करण्याची तयारी असेल तर आपण यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकतो. श्रावणीने दिवस-रात्र अभ्यास करत नीट परीक्षेत मुलींमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे श्रावणीला मिळालेले हे यश देशातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना प्रेरणादायी ठरले आहे. आगामी काळात श्रावणीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन यशस्वी तज्ज्ञ डॉक्टर व्हावे, अशा शुभेच्छा तिला दिल्या जात आहेत.