• Thu. Sep 3rd, 2026

वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या भाड्यात १३.५६ टक्के वाढ; दरवाढ मध्यरात्रीपासून लागू – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 17, 2026
वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या भाड्यात १३.५६ टक्के वाढ; दरवाढ मध्यरात्रीपासून लागू – महासंवाद

मुंबई, दि. १७: राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी भाड्यात १३.५६ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली असून ही दरवाढ आज रात्रीपासून लागू होणार आहे. डिझेल, सुटे भाग, टायर, देखभाल खर्च तसेच कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, यापूर्वी लागू करण्यात आलेली साध्या बससेवेवरील १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे.

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ तसेच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यांचा सर्वंकष विचार करून राज्य परिवहन प्राधिकरणाने ही भाडेवाढ मंजूर केली आहे.

राज्यातील लाखो प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार व अखंड सेवा पुरविताना एसटी महामंडळावर वाढत्या खर्चाचा मोठा आर्थिक ताण पडत आहे. या परिस्थितीत महामंडळाची आर्थिक शाश्वतता कायम राखण्यासाठी आणि प्रवासी सेवा अधिक सक्षम व टिकाऊ करण्यासाठी भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे महामंडळाने सांगितले आहे.

परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले, भाडेवाढ निश्चित करताना प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार प्रवासी सेवा सातत्याने उपलब्ध करून देण्यासाठी तसेच एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. प्रवाशांनी नेहमीप्रमाणे एसटीवर दाखविलेला विश्वास कायम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed