• Wed. Jul 15th, 2026
    भाजपश्रेष्ठींचा विरोध मावळावा, जयंत पाटलांचे फडणवीसांना साकडे? ‘वर्षा’वर तासभराच्या बैठकीने चर्चांना उधाण

    Jayant Patil meets Devendra Fadnavis : स्वतः जयंत पाटील भाजपमध्ये सहभागी होणार की, शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत डेरेदाखल होणार याविषयी चर्चा सुरू आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेदेखील उपस्थित होते. या भेटीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

    जयंत पाटील यांची भूमिका चर्चेत

    गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच ‘एनडीए’मध्ये सहभागी होण्याच्या चर्चा सुरू आहेत. परंतु, त्याविषयी पक्षाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. तर, दुसरीकडे स्वतः जयंत पाटील भाजपमध्ये सहभागी होणार की, शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत डेरेदाखल होणार याविषयी चर्चा सुरू आहे.

    चार नेत्यांची तासभर चर्चा

    त्यातच मंगळवारी रात्री राष्ट्रवादीचे पटेल आणि तटकरे हे फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी पोहोचले. त्या पाठोपाठ जयंत पाटील हेदेखील दाखल झाले. आधी दोन्ही राष्ट्रवादीच्या तिघा नेत्यांची स्वतंत्र चर्चा झाली. त्यानंतर चारही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. परंतु, या बैठकीचा तपशील मिळू शकलेला नाही. चर्चेनंतर प्रफुल पटेल हे अमेरिकेला जाण्यासाठी रवाना झाले, तर त्यांच्या पाठोपाठ तटकरे आणि पाटील हेही बाहेर पडले. तीनही नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

    भाजपश्रेष्ठींचा विरोध मावळण्याचे प्रयत्न?

    जयंत पाटील यांना दिल्लीतील भाजपश्रेष्ठींचा विरोध असून तो मावळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते साकडे घालत असल्याचे कळते. तर, त्यांची रदबदली स्वतः राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष पटेल आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे हे करत असल्याचेही बोलले जात आहे.
    Maharashtra TimesUday Samant : शिंदेंचा देशात चमत्कार, NDA मध्ये तिसऱ्या क्रमांकाचे नेते, उदय सामंतांची स्तुतिसुमनं; नवी योजना आणणार, पण ‘लाडकी बहीण’सारखी नाही!

    जयंत पाटलांनी दावे फेटाळले

    दरम्यान, मी माझ्या मतदारसंघातील कामांच्या संदर्भात बोलण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. केवळ पाचच मिनिटं देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझं बोलणं झालं. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे सुद्धा वर्षावर असल्याची कुठलीही माहिती मला नव्हती. आम्हा चौघांमध्ये कुठलीही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही, असा दावा जयंत पाटील यांनी या भेटीनंतर केला.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा