• Wed. Jul 15th, 2026

    महाराष्ट्रावर ढग परतले, वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडणार, मुंबईसह ६ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

    महाराष्ट्रावर ढग परतले, वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडणार, मुंबईसह ६ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

    Mumbai Yellow Alert: अनेक दिवस दडी मारल्यानंतर पाऊस परतणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून महाराष्ट्रावर ढग निर्माण झाले आहेत. १५ जुलै २०२६ रोजी मुंबई, ठाणे, कोकण, मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्याचं हवामान कसं असेल?

    मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. जुलैच्या सुरुवातीला धो-धो बरसल्यानंतर पुन्हा शांतता होती. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात तापमान पुन्हा वाढू लागलं होतं. पण आता नागरिकांना पुन्हा दिलासा मिळणार आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १५ जुलैपासून राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा ‘कमबॅक’ होणार आहे. बुधवारी संपूर्ण राज्यातील हवामान कसं असेल हे पाहूया.

    वादळी वाऱ्यांसह पावसाचा कमबॅक होणार

    भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, या आठवड्यात राज्यात सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता कमी होती. २० जुलैपासून मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात होईल असा अंदाज आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये १५ जुलै रोजी वातावरण कोरडचं राहील किंवा हलक्या सरींची शक्यता आहे. पण कोकण विभागाच्या दिशेने ताशी ४० ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पावसाचं पुनार्गमन होणार आहे.

    हवामान विभागाने १५ जुलै रोजी पहाटे चार वाजता जारी केलेल्या अलर्टनुसार, आज मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारी या परिसरांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्यांतच्या वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर कोकणात आज हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

    पश्चिम महाराष्ट्रात काय परिस्थिती?

    सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात आज पावसाचा जोर कमीच राहील असा अंदाज आहे. जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. सातारा आणि कोल्हापुरात घाट परिसरात वादळी वाऱ्यांसह मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातही दिवसभर हलक्या पावसाची शक्यता आहे घाट परिसरात वादळी वाऱ्यांसह मध्यम पाऊस होऊ शकतो. १७ जुलैनंतर पुण्यातील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.

    उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशात हवामान कसं असेल?

    नाशिक जिल्ह्यांत आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्येही वादळी वारं आणि विजांच्या कडकडाटासह मध्य पाऊस होईल. अहिल्यानगरमध्ये आज हलका पाऊस असेल. तर जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढेल.

    मराठवाड्यात हवामान कसं असेल?

    छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्येही १५ ते १६ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे. परभणी, बीड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह हलका पाऊस होईल. धाराशिव आणि हिंगोलीमध्ये हलका पाऊस होईल. नांदेड जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

    विदर्भातील हवामानाचा अंदाज

    विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज वातावरण प्रामुख्याने कोरडं राहील. काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. १६ जुलैपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये १५ जुलैसाठी कोणताही अलर्ट देण्यात आला नाही.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा