ST Bus Ticker Fare Hike: उन्हाळ्यात एसटी बसच्या भाड्यात दहा टक्क्यांनी वाढ केली होती. आता सुट्ट्या पैशांसाठी होणारे वाद टाळण्यासाठी महामंडळाने पुन्हा एकदा भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. बुधावरी होणाऱ्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महेश चेमटे, मुंबई: उन्हाळ्यातील हंगामी भाडेवाढ रद्द होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो एसटी प्रवाशांच्या पदरी निराशा पडणार आहे. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने १३.५० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. सुट्ट्या पैशांमुळे होणारा वाद टाळण्यासाठी यंदा पाच रुपयांच्या पटीत तिकीट ठेवण्यात येणार आहे. आज, बुधवारी होणाऱ्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत ( एसटीए ) भाडेवाढीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
३.५० टक्क्यांची भर
राज्यात १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत १० टक्के हंगामी भाडेवाढ लागू करण्यात आली. त्याला एक महिन्याची, अर्थात १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत आज, बुधवारी संपुष्टात येणार आहे. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने तयार केलेल्या प्रस्तावात १३.५० टक्के भाडेवाढीची शिफारस केली आहे. सध्या १० टक्के भाडेवाढीनुसार प्रवासी तिकीट घेत आहेत. यात आता आणखी ३.५० टक्क्यांची भर पडणार आहे.
Weather Alert: महाराष्ट्रावर ढग परतले, वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडणार, मुंबईसह ६ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
राज्य परिवहन प्राधिकरणाने गर्दीच्या हंगामात महामंडळाला ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याची मुभा दिली आहे. राज्य सरकारनेही एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या पगारासह अन्य खर्च स्वत:च भागवण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. बैठकीत भाडेवाढीला मंजुरी मिळाल्यावर, त्याची अमंलबजावणी तातडीने करण्यात येणार आहे. सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहक यांच्यात वादाच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे यंदा पाच रुपयांच्या पटीत भाडेवाढीची शिफारस आहे. त्यामुळे सुट्टे पैसे बाळगण्याची प्रवासी आणि वाहकांची चिंता मिटणार आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांत वाढ झाल्याने त्याची भरपाई भाडेवाढीतून करण्यात येईल. जागतिक युद्धजन्य स्थितीमुळे डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. बसगाड्यांच्या सुट्ट्या भागांसह टायरच्या किंमतीतदेखील वाढ झाली आहे. यामुळे एकूण खर्चाचा विचार करता, भाडेवाढ गरजेची असल्याची भूमिका एसटी महामंडळाने घेतली आहे. या पूर्वी जानेवारी २०२५ मध्ये १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. ही वाढ लागू करताना एक रुपयांच्या पटीत केल्याने वाहक आणि प्रवासी यांच्यात मोठ्या प्रमाणात वादाच्या घटना समोर आल्या होत्या.
Ashadhi Ekadashi Yatra: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आषाढी यात्रेसाठी धावणार 5500 एसटी बसेस, परिवहनमंत्र्यांची मोठी घोषणा
मात्र, भाडेवाढीचा पर्याय अपुरा
यंदा हंगामी भाडेवाढीनंतर मे महिन्याच्या जमा-खर्चाचा महामंडळाने आढावा घेतला. महामंडळाचे मे महिन्यात एकूण वाहतूक उत्पन्न १,०४७.१७ कोटी इतके नोंदवण्यात आले आहे. तर खर्चाचा आकडा १,०९६.०७ कोटी रुपये आहे. राज्यातील ३१ पैकी २२ विभागांना आपला खर्च भागवण्याइतपतही महसूल मिळवता आलेला नाही. यामुळे महसूल वाढवण्यासाठी केवळ भाडेवाढीचा पर्याय अपुरा ठरल्याचे स्पष्ट झाले होते.
एसटी बसचे भाडे सतत वाढल्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. ही भाडेवाढ योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा