• Tue. Jul 14th, 2026

    २०२७-२८ पासून सीईटीद्वारे होणार एएनएम-जीएनएम प्रवेश – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 14, 2026
    २०२७-२८ पासून सीईटीद्वारे होणार एएनएम-जीएनएम प्रवेश – महासंवाद

    मुंबई, दि. १४ : राज्यातील एएनएम आणि जीएनएम परिचारिका पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता, गुणवत्ता आणि एकसमानता आणण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखालील तसेच महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळाशी संलग्न महाविद्यालयांतील एएनएम व जीएनएम अभ्यासक्रमांचा प्रवेश राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) मार्फत करण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय ३० जून २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

    राज्यात आतापर्यंत एएनएम व जीएनएम अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत विविधता असल्याने एकसमान निकषांचा अभाव, पारदर्शकतेचा प्रश्न आणि विद्यार्थ्यांवरील अनावश्यक ताण अशा समस्या निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणेच सीईटी प्रणाली लागू करून गुणवत्तापूर्ण आणि न्याय्य प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या प्रणालीअंतर्गत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) माहिती पुस्तिका प्रसिद्ध करणे, अर्ज नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, गुणवत्ता यादी जाहीर करणे, जागा निश्चिती आणि जागा वाटप ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडणार आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ, संगणकीकृत आणि पारदर्शक होणार असून विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध होईल.

    प्रवेशासाठीचे पात्रता निकष भारतीय परिचारिका परिषदेच्या नियमांनुसार राहतील. तसेच शासनाच्या विद्यमान आरक्षण धोरणानुसार प्रवेश दिले जातील. सरकारी महाविद्यालयांतील शुल्क शासनाच्या धोरणानुसार, तर खासगी महाविद्यालयांतील शुल्क, शुल्क नियामक प्राधिकरणाच्या नियमानुसार निश्चित केले जाईल. या निर्णयामुळे राज्यातील परिचारिका शिक्षण व्यवस्थेला अधिक विश्वासार्ह, गुणवत्तापूर्ण आणि स्पर्धात्मक दिशा मिळणार असून पात्र विद्यार्थ्यांना पारदर्शक पद्धतीने प्रवेशाची संधी उपलब्ध होईल. आरोग्य क्षेत्रासाठी सक्षम आणि गुणवंत परिचारिका मनुष्यबळ तयार करण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

    तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखालील व महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळाशी संलग्नीत महाविद्यालयांतील एएनएम व जीएनएम. या परिचर्या पदविका अभ्यासक्रमांसाठीचे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीचे प्रवेश राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या माध्यमातून केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (सीएपी) बारावीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहेत.

     

     

    0000

    दत्तात्रय कोकरे/विसंअ

     

     

     

     

    विजयवाडी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्धतेची कार्यवाही तातडीने  करा – ग्राम विकास  मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद
    महात्मा फुले कृषी विद्यापीठाची पदभरती प्रक्रिया वेगात पूर्ण करावी – जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
    अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या समस्यांबाबत सकारात्मक निर्णय घेणार – ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed