Pune News: पुणे महानगरपालिका पुन्हा एका दिवसाआड पाणीपुरवठा पुन्हा सुरू करणार आहे, जेणेकरून भविष्यात वाढणारी मागणी भागवण्यासाठी पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध राहील.
यंदाच्या वर्षी ‘एल निनो’ सक्रिय असल्याने पर्जन्यमान कमी राहण्याचा इशारा हवामान विभागाने पूर्वीच दिला आहे. पुणे शहराला प्रामुख्याने खडकवासला धरणसाखळीतून पाणीपुरवठा केला जातो. या धरणातील एकूण पाणीसाठा चार अब्ज घनफूटांपेक्षाही (टीएमसी) कमी झाला होता. त्यामुळे तातडीने पाणीकपात लागू करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने १५ जूनपासून शहरात सम-विषम तारखांनुसार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली. याखेरीज वॉशिंग सेंटर्स बंद करणे, बांधकामांसाठी पिण्याचे पाणी न वापरणे आदी नियम लागू केले. त्यामुळे काही प्रमाणात पाण्याची बचत झाली. दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यात मुक्कामी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सात ते १२ जुलैदरम्यान पाणीकपात रद्द करण्यात आली होती.
Pune Revenue Scam: महसूल विभागातील 15 अधिकारी निलंबित; कलम 155चा गैरवापर केल्याने सरकारचा दणका, प्रकरण काय?
दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत १६.८९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा ४.१२ टीएमसीने कमी आहे. त्यामुळे पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे. त्यामुळे शहरात उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितले.
पावसाने उघडीप दिल्याने चिंता
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सोमवारी १६.८९ ‘टीएमसी’ पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी २१ ‘टीएमसी’ इतका पाणीसाठा होता. यंदा शहरात गेल्या आठवड्यात जोरदार बरसलेल्या पावसाने आठवडाभरापासून विश्रांती घेतली आहे. जिल्ह्यामध्येही पावसाचा जोर ओसरला असून, अधूनमधून हलक्या सरी हजेरी लावत आहेत. घाट माथ्यावर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे. तापमानातही वाढ झाली आहे. अनुकूल वातावरण नसल्याने पुढील चार दिवसांत पावसाची शक्यता नसून, दुपारनंतर आकाश मुख्यत: ढगाळ राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. महिनाअखेरीस पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा एकूणच पाऊस कमी पडण्याची शक्यता असल्याने पाणीकपातीचे पुणेकरांवरील संकट कायम राहणार असल्याचे चित्र सध्या दिसते आहे.
Maharashtra Weather: ऐन जुलै महिन्यात राज्यात कोरडं वातावरण, पण येत्या आठवड्यात पाऊस धुमाकूळ घालणार; हवामान विभागाचा अंदाज
“काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. शहराची वाढती लोकसंख्या, वाढती पाण्याची मागणी आणि पुढील उन्हाळ्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा राखून ठेवण्याची गरज लक्षात घेऊन पुन्हा पाणीकपात लागू करावी लागणार आहे. धरणे शंभर टक्के भरेपर्यंत कपात सुरू ठेवावी लागेल,” असं पुणे महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांनी नमूद केलं.
दोन दिवसांपूर्वीच महापालिकेने तूर्तास पाणीकपात नाही अशी घोषणा केल्यानंतर पुन्हा आता यू-टर्न घेतला आहे. यावर तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा
