पुणे : दि. ११ :आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘चरणसेवा’ उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे, अशी माहिती कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे.
राज्यातील ११ जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील सुमारे ४०० मुक्कामस्थळी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, १२ हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज असून सेवा करीत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पुणे शहरातील उपक्रमाला भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचे सांगत अशा सेवाकार्यात सहभागी होणे हे मोठे भाग्य असल्याची भावना श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.
वारकऱ्यांच्या पायांवरील ताण कमी करण्यासाठी सुमारे ३ हजार लिटर औषधी आयुर्वेदिक तेलाद्वारे पायांची मालिश, फिजिओथेरपी, प्राथमिक उपचार, वैद्यकीय तपासणी तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालयात संदर्भित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गरजेनुसार रुग्णवाहिका सेवाही सज्ज ठेवण्यात आली आहे.
याशिवाय, पालखी मार्गावर ८ आरोग्य जनजागृती रथांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती, स्वच्छतेचे महत्त्व, संसर्गजन्य व पावसाळ्यातील आजारांपासून बचाव, निरोगी जीवनशैली आणि प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक मार्गदर्शन वारकरी व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. निवडक ठिकाणी योगसत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे.
श्री. रामेश्वर नाईक, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित गतवर्षी ‘चरणसेवा’ उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या वर्षीही ११ जिल्ह्यांतील सुमारे ४०० सेवा केंद्रांवर १२ हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक कार्यरत असून, ३ हजार लिटर औषधी आयुर्वेदिक तेल, रुग्णवाहिका सेवा आणि ८ आरोग्य जनजागृती रथांच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक वारकऱ्यांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ या संकल्पनेवर आधारित ‘चरणसेवा’ उपक्रमातून वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाला आधुनिक वैद्यकीय सेवेची जोड देण्यात आली असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने सर्व वारकरी, दिंडी प्रमुख आणि पालखी मार्गावरील नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
0000
