• Sun. Jul 12th, 2026

    पुणेकरांना दिलासा मिळणार, मुसळधार पावसामुळे धरणसाठ्यात वाढ; पाणीकपातीबाबत महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय

    ByMH LIVE NEWS

    Jul 12, 2026
    पुणेकरांना दिलासा मिळणार, मुसळधार पावसामुळे धरणसाठ्यात वाढ; पाणीकपातीबाबत महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय

     पालखी सोहळ्याच्या मुक्कामामुळे पुण्यातील दिवसाआड पाणीकपात स्थगित करण्यात आली होती. मात्र, दरम्यानच्या काळात झालेला पाऊस व धरणसाठ्यात झालेली मोठी वाढ लक्षात घेता पुणे महापालिकेने तूर्त पाणीकपात लागू न करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

    यंदाच्या वर्षी ‘एल निनो’ सक्रिय असल्याने पर्जन्यमान कमी राहण्याचा इशारा हवामान विभागाने पूर्वीच दिला आहे. पुणे शहराला प्रामुख्याने खडकवासला धरणसाखळीतून पाणीपुरवठा केला जातो. या धरणातील एकूण पाणीसाठा चार अब्ज घनफूटांपेक्षाही (टीएमसी) कमी झाला होता. त्यामुळे तातडीने पाणीकपात लागू करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने १५ जूनपासून शहरात सम-विषम तारखांनुसार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली.

    धरणसाठ्यात लक्षणीय वाढ

    याखेरीज वॉशिंग सेंटर बंद करणे, बांधकामांसाठी पिण्याचे पाणी न वापरणे आदी नियम लागू केले. त्यामुळे काही प्रमाणात पाण्याची बचत झाली. एक जुलैनंतर शहरात दमदार पाऊस झाला. या पावसाने जूनमधील कमतरता भरून काढून जुलैमधील सरासरीही ओलांडली. शहरापेक्षाही धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. खडकवासला धरण साखळीत सध्या १६.६४ टीएमसी पाणी जमा झाले आहे. मागील वर्षी हा पाणीसाठा २०.४२ टीएमसी होता. पाच दिवसांपूर्वी सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात १३ टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीकपात रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यातच नऊ ते ११ जुलै दरम्यान संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पालख्या शहरात मुक्कामी असल्याने १२ जुलैपर्यंत दिवसाआड पाणीकपात रद्द करण्यात आली होती.

    पाणीकपात रद्द करण्याची मुदत आज (रविवार) संपणार आहे. त्यामुळे सोमवारपासून पुन्हा पाणीकपात होणार का, असा सवाल पुणेकर करीत होते. पाणीकपात पुन्हा सुरू करायची की नाही, याबाबत महापालिका प्रशासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही. धरणासाठा वाढल्याने पाणीकपात नको, अशी भूमिका महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. महापालिकेने सोमवारपासून अचानक पाणीकपात लागू केल्यास त्याचा फटका नागरिकांना बसण्याची शक्यता होती.


    ‘पक्षनेत्यांच्या बैठकीत निर्णय’

    ‘पालखी मुक्कामासाठी पाणीकपात रद्द केल्याच्या निर्णयात अद्याप बदल केलेला नाही. पुन्हा पाणीकपातीचा निर्णय होईपर्यंत नियमितपणे पाणीपुरवठा केला जाईल. जुन्या वेळापत्रकानुसार दिवसाआड पाणीकपात पुन्हा सुरू करू नये, अशा सूचना पाणीपुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. पाणीकपातीसंदर्भातील निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत होईल,’ असे पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *