• Wed. Aug 26th, 2026

वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 10, 2026
वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

पुणे, दि. १० : मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्यावतीने आयोजित ‘श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरण सेवा’ उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचे सांगत अशा सेवाकार्यात सहभागी होणे हे मोठे भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे दर्शन घेऊन व आशीर्वाद घेऊन या सेवाकार्यात सहभागी होत असल्याचा विशेष आनंद आहे. वारीत सहभागी होणारे वारकरी भगिनी-बंधू दीर्घ पायी प्रवास करून येथे पोहोचतात. त्यांचा शारीरिक शीण दूर व्हावा, या उद्देशाने राबविण्यात येणारा ‘चरण सेवा’ उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.

वारकरी संप्रदायात प्रत्येकामध्ये माऊलीचे दर्शन घेतले जाते. एकमेकांच्या चरणी नम्रतेने वंदन करण्याची परंपरा ही समतेचा आणि भक्तीचा संदेश देणारी आहे. अशा वारकऱ्यांच्या चरणांची सेवा करण्याची संधी मिळणे हे मोठे भाग्य असून, विठुरायाच्या भक्तांची सेवा हीच विठ्ठलभक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमात तरुण स्वयंसेवक मोठ्या समर्पित भावनेने वारकऱ्यांची सेवा करत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.  या सेवाकार्यात सहभागी झालेल्या सर्व स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते आणि आयोजकांचे त्यांनी अभिनंदन केले. विशेषतः आमदार श्री. सुनील कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले.

ग्रामविकास विभागामार्फत आधुनिक पद्धतीच्या चरण सेवा यंत्रांचीदेखील उपलब्धता करून देण्यात आली असून त्याद्वारे वारकऱ्यांना अधिक चांगली सुविधा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

गेल्या काही वर्षांत आषाढी वारीच्या व्यवस्थापनात अनेक सकारात्मक बदल करण्यात आल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, वारकऱ्यांसाठी जर्मन हँगरची व्यवस्था, निर्मल वारी अभियान, प्रशस्त पालखी मार्ग अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच येत्या दोन ते तीन वर्षांत पंढरपूर कॉरिडॉरचे काम पूर्ण करण्याचा शासनाचा मानस असून, भविष्यात पंढरपूरचा विकास काशी, अयोध्या आणि उज्जैनप्रमाणे आदर्श धार्मिक क्षेत्र म्हणून करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील कांबळे, हेमंत रासने आदी उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed