• Fri. Jul 10th, 2026

    जागतिक मराठी परिवार महाराष्ट्राच्या विकासाचा महत्त्वाचा भागीदार – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 10, 2026
    जागतिक मराठी परिवार महाराष्ट्राच्या विकासाचा महत्त्वाचा भागीदार – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    मुंबई, दि. १० : जगभरातील मराठी समाज हा महाराष्ट्राच्या विकासाचा महत्त्वाचा भागीदार असून त्यांचे ज्ञान, अनुभव, जागतिक संपर्क आणि गुंतवणूक राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोलाची ठरणार आहे. त्यामुळे जगभरातील मराठी परिवाराशी अधिक परिणामकारक, सातत्यपूर्ण आणि संस्थात्मक संबंध प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

    सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित ‘मध्यपूर्व आणि आफ्रिका डायस्पोरा आउटरीच‘ या ऑनलाईन संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे, विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार, ओमान, बहरीन, कुवेत, दक्षिण आफ्रिका, केनिया, नायजेरिया, युगांडा आदी देशांतील महाराष्ट्र मंडळांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

    राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राजशिष्टाचार विभागाकडे थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) तसेच डायस्पोरा अफेअर्स अँड आउटरीच या नव्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. या माध्यमातून जगभरातील महाराष्ट्राच्या परिवाराशी दृढ, सातत्यपूर्ण आणि परिणामकारक संबंध निर्माण करण्याचे काम सुरू असून जागतिक मराठी समाजाला राज्याच्या विकास प्रक्रियेत सक्रिय भागीदार म्हणून जोडण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

    महाराष्ट्राची ताकद केवळ राज्याच्या भौगोलिक सीमांमध्ये नसून जगभर आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राचा गौरव वाढविणाऱ्या प्रत्येक मराठी व्यक्तीमध्ये असल्याचे सांगून त्यांनी उद्योग, व्यापार, आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान, वित्त, संशोधन आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मराठी बांधवांचे अभिनंदन केले. परदेशात राहूनही मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि परंपरा जतन करणाऱ्या महाराष्ट्र मंडळे व सामाजिक संस्थांच्या कार्याचेही राजशिष्टाचार मंत्री रावल यांनी कौतुक केले.

    मध्यपूर्वेतील सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथील मराठी बांधवांच्या सुरक्षिततेबाबत महाराष्ट्र शासन संवेदनशील असल्याचे सांगून सर्वांनी स्थानिक प्रशासनाच्या सुरक्षा सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. संयुक्त अरब अमिरातीतील इंडियन पीपल्स फोरम महा हेल्पलाइनने संकटाच्या काळात १,२०० भारतीय पर्यटकांना सुरक्षितपणे मायदेशी परतण्यास मदत केल्याबद्दल संबंधित संस्था आणि सदस्यांचे मंत्री रावल यांनी विशेष अभिनंदन केले.

    आफ्रिका खंडातील काही भागांमध्ये इबोला आणि इतर संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांच्या सूचनांचे पालन करून स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

    राज्यात उद्योग, पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित ऊर्जा, लॉजिस्टिक्स, पर्यटन, कृषी, अन्न प्रक्रिया आणि स्टार्टअप्स या क्षेत्रांत वेगाने प्रगती होत असल्याचे सांगून महाराष्ट्राला केवळ आर्थिक गुंतवणूक नव्हे, तर जागतिक मराठी समाजाचे ज्ञान, अनुभव, कौशल्य आणि जागतिक संपर्क जाळेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेला ‘महाएनआरआय कनेक्ट’ हा उपक्रम जगभरातील मराठी समाजाला महाराष्ट्र शासनाशी जोडणारे प्रभावी डिजिटल व्यासपीठ ठरणार असून गुंतवणूक, उद्योग, ज्ञानाची देवाणघेवाण, सांस्कृतिक आदानप्रदान आणि शासनाशी थेट संवादासाठी त्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    मागील आठवड्यात अमेरिकेतील मराठी बांधवांशी संवाद साधल्यानंतर आता मध्यपूर्व आणि आफ्रिका खंडातील मराठी समाजाशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त करत त्यांनी हा संवाद यापुढेही नियमितपणे सुरू राहील, अशी ग्वाही दिली. महाराष्ट्र शासनाला जगभरातील मराठी समाजाशी केवळ संपर्क ठेवायचा नसून कायमस्वरूपी, विश्वासाचे आणि विकासाभिमुख नाते निर्माण करायचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

    कार्यक्रमात मध्यपूर्व आणि आफ्रिका खंडातील विविध महाराष्ट्र मंडळांच्या प्रतिनिधींनी आपले अनुभव, सूचना आणि अपेक्षा व्यक्त केल्या. शासनाशी सातत्यपूर्ण संवाद आणि अधिक समन्वयाची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

    00000

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed