• Fri. Jul 10th, 2026

    निवृत्त होत असल्यास सदस्यांनी जनतेच्या हितासाठी केलेले काम आणि सभागृहातील कामकाजातील योगदान मोलाचे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 10, 2026
    निवृत्त होत असल्यास सदस्यांनी जनतेच्या हितासाठी केलेले काम आणि सभागृहातील कामकाजातील योगदान मोलाचे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    मुंबई, दि. १०: विधानपरिषदेतून निवृत्त होत असलेल्या सदस्यांनी त्यांच्या कार्यकाळात जनतेच्या हितासाठी केलेले काम आणि विधानपरिषदेच्या कामकाजात त्यांनी दिलेले योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी केले. विधानपरिषदेतून निवृत्त होत असलेले सदस्य सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आसगावकर या पाच सदस्यांना निरोप देण्यात आला.

    शिक्षण, सहकार, सामाजिक कार्य,  शिक्षकांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या सदस्यांच्या कार्याचा गौरव करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सदस्यांच्या लोकसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, जनहिताच्या प्रश्नांवर सर्वांनी दाखविलेली बांधिलकी आणि सभागृहाच्या परंपरेचा जपणूक करण्याची भूमिका कायम स्मरणात राहील.

    जयंत आसगावकर यांनी शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सातत्याने अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले. शिक्षण व्यवस्थेचा सखोल अभ्यास आणि शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत.

    सतीश चव्हाण यांनी विद्यार्थी, बेरोजगार युवक आणि मराठवाड्याच्या विकासाशी निगडित प्रश्न सातत्याने सभागृहात मांडले. युवकांना न्याय मिळावा आणि रोजगाराच्या संधी वाढाव्यात, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचा उल्लेख उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.

    अभिजित वंजारी यांनी सामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. विद्यार्थी चळवळ, शिक्षण, समाजकारण तसेच कोविड-१९ काळात वैद्यकीय मदत, अन्नधान्य आणि गरजूंना दिलेल्या सहाय्यामुळे त्यांनी लोकाभिमुख नेतृत्वाची ओळख निर्माण केल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काढले.

    अरुण लाड यांनी सहकार, शिक्षण आणि समाजकारण या क्षेत्रांत दिलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख करत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सहकारी संस्थांबरोबरच रक्तदान शिबिरे, साक्षरता अभियान, महिला सक्षमीकरण, आरोग्य शिबिरे आणि पर्यावरण जनजागृतीसारख्या उपक्रमांमुळे त्यांनी समाजाशी कायमची नाळ जपली असल्याचे म्हणाले.

    किरण सरनाईक यांनी विधानपरिषदेत विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करून लोकप्रतिनिधी म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या शांत, संयमी आणि अभ्यासू भूमिकेचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुक केले.

    विधानपरिषदेतून निवृत्त होणाऱ्या या सदस्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या समर्पित कार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून सार्वजनिक जीवनातील त्यांची पुढील वाटचाल अधिक यशस्वी होवो, समाजसेवेची त्यांची परंपरा अशीच अखंड सुरू राहो आणि जनतेच्या सेवेसाठी त्यांचे योगदान भविष्यातही कायम राहो, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

    यावेळी अन्य सदस्यांसह निवृत्त होत असलेल्या सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

    ००००

    एकनाथ पोवार/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed