वावी ग्राम आरोग्य केंद्राचा नव्या आराखड्यात समावेश करण्यात येणार – मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. १०: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी येथे ग्राम आरोग्य केंद्राचा नव्या आराखड्यात समावेश करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य रविंद्र फाटक, भाई जगताप, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, वावी येथे पूर्वीपासून प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत असून, तेथील वाढती गरज लक्षात घेऊन सुविधा विस्ताराचा प्रस्ताव विचाराधीन आहे. शिर्डीकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर हे ठिकाण असल्याने तेथे ग्राम आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे. बदलती लोकसंख्या आणि वाढत्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन विभागाचा नवीन आराखडा तयार करण्यात येत असून, त्यामध्ये नव्या आरोग्य संस्थांचा समावेश करण्याचा विचार केला जात आहे. या प्रक्रियेत वावी ग्राम आरोग्य केंद्राच्या प्रस्तावाचाही सकारात्मक विचार केला जाईल.
मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, रुग्णालयांना मंजुरी मिळाल्यानंतर निधी, पदनिर्मिती, उपकरणांची उपलब्धता आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागतो. मात्र, गेल्या काही वर्षांत या प्रक्रियेला गती देण्यात आली असून, राज्यातील बांधून तयार असलेली अनेक रुग्णालये आणि आरोग्य संस्था लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात येईल, तसेच आवश्यक आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी सांगितले.
००००
शैलजा पाटील/विसंअ
