• Sat. Jul 11th, 2026

    Suhas Kande On Bhujbal: भुजबळांच्या खात्यात घोटाळा! आमदार सुहास कांदेंचा गंभीर आरोप, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

    Suhas Kande On Bhujbal: भुजबळांच्या खात्यात घोटाळा! आमदार सुहास कांदेंचा गंभीर आरोप, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

    Suhas Kande On Bhujbal: विधानसभा निवडणुकीनंतर शांत झालेला भुजबळ आणि कांदे यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे.

    सुहास कांदे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: राज्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी काढलेल्या सुमारे चार हजार कोटींच्या निविदा प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला. विधान भवनाच्या पायऱ्यांवर गुरुवारी (दि.९) आंदोलन करीत ही निविदा तत्काळ रद्द करून संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी आमदार कांदे यांनी केली.

    आमदार कांदे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या निविदा प्रक्रियेवरून थेट विधिमंडळात ठिय्या आंदोलन करीत भुजबळ काका-पुतण्यावरच शरसंधान साधले. विधिमंडळात आमदार कांदे यांनी घोषणाबाजी करत निविदा प्रक्रियेतील कथित अनियमिततेकडे सरकारचे लक्ष वेधले. धान्य वाहतुकीच्या निविदा तीन वर्षांसाठी काढल्या जात होत्या. मात्र, यावेळी कोणतेही स्पष्ट कारण न देता त्या थेट पाच वर्षांसाठी काढण्यात आल्या असून, त्यात सहाशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप कांदे यांनी केला.
    Maharashtra TimesMoushumi Chatterjee : अभिनेत्री मौशमी चॅटर्जींना दणका, नाशिकच्या निवृत्त डॉक्टरला मानसिक त्रासाची भरपाई द्या, ग्राहक आयोगाचे आदेश
    या विभागात १२ वर्षांपासून मोजक्याच ठेकेदारांना सातत्याने कामे मिळत असून, प्रत्येक निविदेत तेच ठेकेदार सहभागी होत असल्याने संपूर्ण प्रक्रिया संगनमतातून राबविली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या निविदेमुळे राज्यातील २-२.५ लाख माथाडी हमालांचा बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होणार आहे. प्रक्रियेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, न्यायालयाने प्रक्रियेवर स्थगिती दिल्याचा उल्लेख करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

    Suhas Kande On Chhagan Bhujbal | महायुतीतच अंतर्गत संघर्ष? कांदेंचा भुजबळांविरोधात पायऱ्यांवर ठिय्या

    धान्य वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्याकडून काढून ते केवळ अन्न व नागरी पुरवठा विभागाकडेच ठेवल्याचाही मुद्दा आमदार कांदे यांनी उपस्थित केला.
    Maharashtra TimesMalegaon Farmer: मालेगावात शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन; लाखो रुपयांची फसवणूक, पोलिस अधिकाऱ्याची उचलबांगडी, प्रकरण काय?
    समीर भुजबळांची चौकशी करा
    आंदोलनादरम्यान आमदार कांदे यांनी थेट समीर भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले. अन्न व नागरी पुरवठा विभाग प्रत्यक्षात समीर भुजबळच चालवत असून, निविदा प्रक्रियेतील सर्व महत्त्वाचे निर्णय त्यांच्या प्रभावाखाली घेतले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. धान्य वाहतूक निविदा प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी झाल्यास संपूर्ण सत्य बाहेर येईल, असा दावा करत या प्रकरणातील समीर भुजबळ यांच्या भूमिकेचीही चौकशी करावी, अशी मागणी आमदार कांदे यांनी केली. एरव्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन करतात. मात्र, सत्ताधारी पक्षातील आमदारानेच सत्ताधाऱ्यांविरुद्ध गुरुवारी आंदोलन केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

    या प्रकरणाची ‘एसआयटी’कडून चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. –सुहास कांदे, आमदार, नांदगाव

    हे आरोप धांदात खोटे आहेत. मंत्रिमंडळाच्या मान्यतेने निविदाप्रक्रिया राबविली गेली. याचा अभ्यास न करता वैफल्यग्रस्त व्यक्तीने राजकीय सूडबुद्धीने हे आरोप केले आहेत. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही.-समीर भुजबळ, माजी खासदार

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा