मुंबई: राज्याच्या राजकारणात लवकरच नवी समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सत्ताधारी महायुतीसोबत जाणार असल्याची चर्चा रंगत आहे. एकीकडे शरद पवार ांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्या कथित गुप्त भेटीबद्दल बोललं जात असतानाच स्वत: शरद पवार यांच्या कृतीनेही संभ्रम निर्माण झाला आहे. शरद पवार हे काल अनेक वर्षांनंतर अधिवेशनादरम्यान विधिमंडळात उपस्थित राहिले. यावेळी पवार यांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यावेळी शिंदे यांनीही पुष्पगुच्छ देत शरद पवारांचं स्वागत केलं. या स्वागताचा फोटो समोर आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. “ज्यांनी आपलं सरकार पाडलं, त्या गद्दारांनी तुम्ही प्रतिष्ठा का देताय? यातून तुमच्या पक्षाची विश्वासार्हता कमी होते,” असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
शरद पवारांच्या भूमिकेवर टीका करताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, “शरद पवार मोठे नेते आहेत. मात्र ज्या एकनाथ शिंदे यांनी राज्याला भ्रष्टाचाराची कीड, गद्दारीची वाळवी लावली, त्या शिंदे यांच्या दालनात शरद पवारांनी बैठक घेणं बरोबर नाही. बैठक घेण्यासाठी अख्खं विधानभवन ओस पडलेलं का? विधानभवनासमोर राष्ट्रवादी भवन आहे, शिवसेना भवन आहे, ते कमी पडलं म्हणून विधिमंडळात भेटीगाठी, बैठका घेतल्या जातात. यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची विश्वासार्हता कमी होते,” अशी टीका पत्रकार परिषदेतून संजय राऊत यांनी केली.
रोहित पवारांच्या नाराजी चर्चा
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर पक्षाचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे नाराज असल्याची माहिती आहे. मागील आठवड्यात विधिमंडळात पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांकडून पक्षाच्या नेत्यांना आगामी दिशेबाबत स्पष्टता देण्याची विनंती करण्यात आली. तेव्हा आपण सत्तसोबत जाण्याचा विचारात असल्याचं ज्येष्ठ नेत्यांकडून आमदारांना सांगण्यात आल्याचे समजते. मात्र ही भूमिका न पटल्याने रोहित पवार हे बैठक अर्धवट सोडून निघून गेल्याचं सांगितलं जात आहे. तसंच काल विधिमंडळात शरद पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीला रोहित पवार अनुपस्थित होते. त्यामुळे ते काय निर्णय घेतात, याबाबत उत्सुकता आहे.
काँग्रेसमध्ये जाणार?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत सहभागी झाल्यास भाजपला विरोध करण्यासाठी रोहित पवार हे काँग्रेस पक्षात सहभागी होऊ शकतात. पक्षाने एनडीएत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यास तुम्ही काय भूमिका घेणार, असा प्रश्न काही दिवसांपूर्वी रोहित पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी अप्रत्यक्षपणे वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिले होते.
दरम्यान, एकीकडे भाजप आणि एकनाथ शिंदेंसोबतच्या सलगीच्या चर्चांनी मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची टीका आणि नातू असलेल्या रोहित पवारांचीही नाराजी, या पार्श्वभूमीवर शरद पवार आगामी काळात नेमका कोणता राजकीय निर्णय घेतात, सत्तेसोबत जाणं पसंत करतात की विरोधात लढण्याची तयारी दाखवतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा