• Sat. Jul 4th, 2026
    धावपट्टीवर विमानाने वेग पकडला, ATC ची अचानक सूचना अन् अत्यंत तातडीचे ब्रेक, पुणे विमानतळावर गंभीर प्रकार, कारण गुंगवणारं

    Pune Airport Dog on Runway : विमानाने धावपट्टीवर पूर्ण वेग घेतला असतानाच वैमानिकांना हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून धावपट्टीवर एक कुत्रा धावत असल्याची माहिती देण्यात आली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुणे-जयपूर विमान धावपट्टीवरून उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाच अचानक कुत्रा समोर आल्यामुळे अत्यंत तातडीने ब्रेक लावून हे विमान जागेवर थांबवावे लागल्याची गंभीर घटना शुक्रवारी घडली. यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. परंतु या घटनेमुळे धावपट्टीवर भटक्या कुत्र्यांचा वावर अजूनही सुरू असल्याचे दिसून आले.

    एटीसीकडून माहिती मिळाली

    पुण्याहून जयपूरसाठी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या ‘आयएक्स २४५८’ या विमानाचे दुपारी सव्वातीन वाजता उड्डाण होणार होते. त्यासाठी विमानात सर्व प्रवासी बसल्यानंतर विमानाला उड्डाणासाठी परवानगी मिळाली. विमानाने उड्डाणासाठी धावपट्टीवर जात वेग पकडला. विमानाने धावपट्टीवर पूर्ण वेग घेतला असतानाच वैमानिकांना हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून (एटीसी) धावपट्टीवर एक कुत्रा धावत असल्याची माहिती देण्यात आली.

    प्रवाशांमध्ये घबराट

    त्यानंतर वैमानिकांनी तातडीने ‘रिजेक्टेड टेकऑफ’ करून विमान सुरक्षितपणे थांबवले. त्यानंतर विमान पुन्हा टर्मिनलकडे नेण्यात आले. या अचानक झालेल्या ब्रेकमुळे काही प्रवासी घाबरले. विमान थांबल्यानंतर नेमके काय घडले याची माहिती मिळेपर्यंत प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. त्यानंतर वैमानिकांनी धावपट्टीवर कुत्रा आल्यामुळे सुरक्षा म्हणून उड्डाण थांबवल्याची घोषणा केली. त्यानंतर एका तासाने चार वाजून २७ मिनिटांनी विमानाचे उशिराने उड्डाण झाले; पण ही घटना वेळीच समजल्याने मोठी दुर्घटना टळली.
    Maharashtra TimesVenezuela Earthquake : मी जिवंत आहे, माझ्या बायकोला सांगू नका; बोगदा खणून 8 दिवसांनी वाचवलं, त्याचेच शब्द ऐकून बचाव पथक बुचकळ्यात, कारण समजताच गलबलले

    …तरीही उपाय अपुरेच

    धावपट्टीवर कुत्रे येण्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यात धावपट्टीवर कुत्रा दिसल्यामुळे लँडिंग थांबवून विमानाला हवेत घिरट्या माराव्या लागल्या होत्या; तसेच काही महिन्यांपूर्वीही कुत्रे आणि इतर प्राणी धावपट्टी परिसरात आढळल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर हवाई दल, महापालिका प्रशासन आणि विमानतळ प्रशासनाने कुंपणाची दुरुस्ती, गस्त वाढवणे, प्राणी पकडण्यासाठी विशेष पथके नियुक्त करणे आणि परिसरातील प्रवेश ठिकाणे बंद करण्याच्या उपाययोजना केल्याचा दावा केला होता. मात्र, ताज्या घटनेमुळे या उपाययोजना प्रभावी ठरत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

    Maharashtra Farmer Gaun Khanij Royalty Free विहीर, गोठा, शेतघरांसाठी गौण खनिज मोफत

    पक्षी धडकल्याचीही जुनी घटना

    पुणे विमानतळावर दिल्लीहून येणाऱ्या विमानाच्या इंजिनाला पक्षी धडकल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती; तसेच धावपट्टी परिसरात पक्ष्यांचा वावर असल्याचे आढळल्यामुळे उड्डाणे थांबवण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. काही दिवसांपूर्वी बिबट्याच धावपट्टीच्या परिसरात दिसल्याचे समोर आले होते. त्यामुळे सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
    Maharashtra TimesKetan Agarwal Murder : निकनेम आणि कोड लँग्वेज… चेतन-सियाने डिलीट केलेल्या चॅटची रिकव्हरी, बीडवासी वर्गमित्राबद्दलही महत्त्वाची माहिती

    धावपट्टी हवाई दलाच्या अखत्यारित

    पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर गंभीर घटना घडलेली असताना त्याची माहिती विमानतळ संचालक संतोष ढोके यांना नसल्याचे त्यांनी सांगितले. धावपट्टी हवाई दलाच्या अखत्यारित येत असून, त्यांनाच ही माहिती विचारा, असे त्यांनी स्पष्ट केले. संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी, विमान कंपनीचे जनसंपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क साधूनदेखील त्यांनी काहीही माहिती दिली नाही. त्यामुळे प्रवासी सुरक्षेच्या घटनेबाबत कोणीही गंभीर नसल्याचे दिसून आले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा