• Thu. Jul 2nd, 2026

    शेतकरी हिताला प्राधान्य देणारी कर्जमुक्ती… – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 2, 2026
    शेतकरी हिताला प्राधान्य देणारी कर्जमुक्ती… – महासंवाद

    राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी करणारी घोषणा केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर कर्जमुक्ती योजना 2026 या अंतर्गत निसर्गाची सर्व रुपे झेलत शेतात राबून आपल्यासाठी अन्न धान्य उत्पादन करणाऱ्या बळीराजाला वेगवेगळया संकटांना सामोरे जावे लागते. या बळीराजाला समर्पित अशी ही सर्वात मोठी कर्जमाफी आहे.

    आपला देश मौसमी हवामानाच्या प्रदेशात आहे आणि बदलते ऋतूचक्र आणि वेळोवेळी येणारी नैसर्गिक आव्हाने झेलत शेती करणे अतिशय कष्टाचे काम आहेच सोबतच लहरी निसर्गाने अवेळी येणारा पाऊस, अतिवृष्टी तर कधी गारपीट याने पेरलं ते उगवलं तरी त्याला बाजारपेठ मिळणं व योग्य भाव मिळणं यांच संकट त्याच्यासमोर असतं. सतत तणाव सहन करीत शेतकरी मेहनत करीत असताना आणि त्याच्या कष्टाचं मोल जाणून कर्जमुक्तीची योजना शासनाने आणली आहे.

    शासनाने याबाबत जे निकष लावले आहेत ते जाणून घेणे महत्वाचे आहे. यात कर्जमुक्तीची व्याप्ती अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा अशीच ठेवण्यात आली आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग या विभागांकडे याची अंमलबजावणी सोपविण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतर  पध्दतीने अर्थात डीबीटी अंतर्गत याचा लाभ मिळणार आहे.

    दोन लाख किंवा त्यापेक्षा कमी कर्ज असेल तर त्या शेतकऱ्याला त्याच्या बँक खात्यात कर्जाची थकीत रक्कम थेट लाभ  स्वरुपात प्राप्त आहे. यासाठी त्याचे बँक  खाते आणि आधार क्रमांक संलग्न असणे आवश्यक आ हे. जे शेतकरी नियमितपणे कर्जाचा हप्ता बँकेत नियमितपणे भरतात त्या सर्वांना प्रोत्साहन देण्याचे धोरण शासनाने निश्चित केले आहे त्यानुसार अशा शेतकरी बांधवांना त्यांच्या बँक खात्यात 50 हजार रुपये प्रोत्साहन स्वरुपात दिले जाणार आहेत.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर सातत्याने शेतकरी केंद्रस्थानी ठेवत अने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आणि त्यासाठी  विशेष योजना तयार करुन त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होवून याचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा असे प्रयत्न केले आहेत. आजवरच्या धोरणात्मक निर्णयामध्ये हा कर्जमुक्तीचा निर्णय शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यास मदत तर करणार आहेच सोबतच यातून नवी वाट त्यांना मिळेल याचाही या निर्णयात विचार झाला आहे.

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव या योजनेला देण्यात आले आहे. यालाही विशेष महत्व आहे. लोककल्याणकारी शासन, जलसंधारण, सिंचन आणि ग्रामीण विकासाचा विचार करणाऱ्या आणि शेतकरी हितासाठी काम करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती वर्षात हा निर्णय घेण्यात आला याला विशेष महत्व आहे.

    प्रशांत दैठणकर ,प्र.उपसंचालक तथा जिल्हा माहिती अधिकारी, बीड

                                      

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *