Pune Crime: केतन अग्रवालचा लोहगडावरुन खाली पडून शेवट झाला. हा अपघात असल्याचं सुरुवातीला मानलं जात होतं. पण हा घातपात असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. केतनची होणारी पत्नी आणि तिच्या प्रियकरानं त्याला कड्यावरुन खाली ढकललं होतं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: पुण्याच्या गहुंजे परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय केतन अग्रवाल यांच्या हत्या प्रकरणात त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण, लोणावळा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेनं या प्रकरणाचा तपास केला. केतनचा मृत्यू लोहगड्यावर सेल्फी काढताना पाय घसरुन पडल्यानं झाल्याचा बनाव सियानं रचला होता. पण पोलीस तपासात तिचं बिंग फुटलं. सिया आणि चेतननं केलेल्या ५ चुका पोलिसांच्या पथ्थ्यावर पडल्या.
१. हुडी अन् झाकलेला चेहरा या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात लोहगड किल्ल्यावरील तिकीट काऊंटरवरील सीसीटीव्हीनं महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं. तेव्हा केतन आणि सियाच्या मागोमाग एक तरुण चालताना दिसला. रणरणत्या उन्हात हुडी घालून फिरत असल्यानं त्याच्यावर पोलिसांना संशय आला. त्यानं चेहरा झाकलेला होता. त्याच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या. Pune Crime: केतनच्या बहिणीमुळे सिया अडकली; मख्ख चेहऱ्यानं बिंग फुटलं; पुरावा न सोडण्याच्या प्रयत्नात चेतन फसला २. १५ दिवसांत ४ वेळा किल्ल्यावर जाण्याचा हट्ट केतनची बहीण संजना आणि कुटुंबानं दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि केतनचा साखरपुडा फेब्रुवारीत झाला. तेव्हापासूनच सिया लोहगडावर जाण्याचा हट्ट करत होती. त्यासाठी ती केतनवर दबाव टाकत होती. १५ दिवसांत ४ वेळा तिनं केतनला किल्ल्यावर नेण्याचा प्रयत्न केला होता. ३१ मे रोजी सिया पहिल्यांदा केतनला घेऊन किल्ल्यावर गेली. १४ जूनला तिनं केतनला कड्यावरुन ढकलून देण्याचा पहिला प्रयत्न केला. पण एका झुडूपचा आधार मिळाल्यानं केतन वाचला. धक्का का दिला, अशी विचारणा केतननं केली असता तिथे साप होता. सर्पदंशापासून वाचवण्यासाठी धक्का दिल्याचं खोटं उत्तर सियानं दिलं होतं. १८ जूनला लोहगडावरुन धक्का देत सिया आणि चेतननं केतनला संपवलं.
३. बाली ट्रिप आणि गूढरित्या गायब झालेला पासपोर्ट केतन आणि सियाचं लग्न नोव्हेंबरमध्ये होणार होतं. त्याआधी ते दोघे बालीला प्री-वेडिंग फोटोशूटला जाणार होते. मात्र बालीला जाण्याआधी केतनचा पासपोर्ट रहस्यमयरित्या गायब झाला. त्यामुळे त्या दोघांना मुंबई विमानतळावरुन माघारी परतावं लागलं. केतन सोबत बालीला जावं लागू नये यासाठी सियानंच त्याचा पासपोर्ट लपवल्याचा संशय होता. Pune Crime: केतनला सियासोबत लोहगडावर जायचंच नव्हतं, कुटुंबाचीही इच्छा नव्हती; अखेरच्या क्षणी काय घडलं? ४. चाणाक्ष बहिणीमुळे सियाचा पर्दाफाश केतनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर ४ दिवसांनी सिया त्याच्या घरी गेली. तेव्हा केतनची बहीण संजनानं तिला १८ जूनला घडलेल्या घटनाक्रमाबद्दल काही थेट प्रश्न केले. ते प्रश्न ऐकून सियाची भंबेरी उडाली. तिनं दिलेली बरीचशी माहिती परस्परविरोधी होती. त्यामुळे संजनाला संशय आला. तिनं याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सियाचा सीडीआर काढला. त्यातून धक्कादायक उलगडा झाला. १ जानेवारी ते जूनपर्यंत सिया आणि चेतन यांच्यात तब्बल २००४ कॉल झाले होते. दोघे कॉलवर २३८ तास बोलले होते. १६ आणि १७ जूनच्या रात्री व्हिडीओ कॉलवर त्यांनी हत्येचा कट रचला.
५. इंटरनेट बंद ठेवण्याची चलाखी अंगाशी पोलिसांना चकवा देण्यासाठी, त्यांची दिशाभूल करण्यासाठी चेतन चौधरीनं १८ जूनच्या सकाळी ७ पासून संध्याकाळी ५.४० पर्यंत मोबाईलमधील इंटरनेट बंद ठेवलं. त्यानं स्वत:चा मोबाईल आपल्या दुकानात ठेवला. स्वत:च लोकेशन कळू नये यासाठी त्यानं ही शक्कल लढवली होती. चेतन त्या दिवशी दुकानातील एका कर्मचाऱ्याचा मोबाईल घेऊन गेला होता. पोलिसांनी त्या मोबाईल नंबरचं लोकेशन ट्रॅक केलं. ते लोहगडावर निघालं आणि चेतन पुरता अडकला.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा