• Sun. Jun 28th, 2026
    Ketan Agarwal: सियाने पळून जाऊन लग्न करण्याऐवजी केतनला का संपवलं? पोलिसांच्या दणक्यानंतर प्रियकर घडाघडा बोलला!

    पुणे: मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेल्यानंतर होणाऱ्या पत्नीने केतन अगरवाल या तरुणाचा खून केल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. सिया गोयल असं आरोपी तरुणीचं नाव असून तिने आपला प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने हा खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. मात्र केतन अगरवाल याला संपवण्याऐवजी त्याला माझं दुसऱ्या तरुणावर प्रेम आहे, असं स्पष्ट सांगून सियाने प्रियकराशी लग्न का केलं नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत आता पोलीस चौकशीदरम्यान सियाचा प्रियकर चेतन चौधरी याने धक्कादायक खुलासा केला आहे.

    पोलीस सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल आणि केतन अगरवाल यांचा फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला होता आणि नोव्हेंबर महिन्यात ते विवाहबंधनात अडकणार होते. मात्र सिया गोयल या २० वर्षीय तरुणीचा जीव चेतन चौधरी या तिच्या प्रियकरात अडकला होता. पण ती तिच्या कुटुंबाला याबाबत सांगू शकत नव्हती. साखरपुडा मोडून चेतनसोबत पळून गेल्यास माझ्या कुटुंबाची बदनामी होईल, असा विचार करून नराधम सियाने थेट होणाऱ्या पतीला संपवण्याचा क्रूर निर्णय घेतला. तिने चेतन चौधरी या प्रियकरासोबत मिळून केतनची हत्या केली.

    लोहगड किल्ल्यावर नेमकं काय घडलं? कशामुळे फुटलं सियाचं बिंग?

    केतनचा मृत्यू हा लोहगड किल्ल्यावरील ट्रेकिंगवेळी झालेल्या अपघातातून झाल्याचं सुरुवातीला भासवण्यात आलं होतं. १८ जून रोजी पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान केतन अगरवाल हा दरीत पडल्याचं सांगण्यात आलं. सिया गोयल हिने कुटुंबीयांना तो ट्रेकदरम्यान घसरून पडल्याचे सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, किल्ल्यावरील तिकीट काउंटरजवळ असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांच्या तपासाला वेगळे वळण मिळाले. या फुटेजमध्ये हुडी घातलेला एक व्यक्ती केतन आणि सिया यांचा पाठलाग करत असल्याचं दिसून आला आणि त्यानंतरच पोलिसांना संशय आला.

    एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, “सदर व्यक्तीने शॉर्ट्स आणि हुडी घातली होती. त्याने हुडीचा पुढील भाग इतका खाली ओढलेला होता की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचा चेहरा दिसत नव्हता. तसंच, या तरुणाने हुडीवर हेडसेटही घातला होता. सिया अचानक मागे वळून पाहत असताना त्याच वेळी हुडी घातलेला व्यक्ती अचानक खाली बसल्याचं दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आलं. आम्ही ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीचं म्हणजेच १८ जूनच्या दिवसाचं तापमान तपासलं असता ते जवळपास ३३ अंश सेल्सिअस असल्याचं आढळलं. मात्र अशा उष्ण वातावरणातही सदर व्यक्तीने हुडी का घातली होती असा प्रश्न निर्माण झाला,” असं पोलिसांनी स्पष्ट केलं.

    दरम्यान, पोलिसांनी अधिक तपास केला असता हुडी घातलेला व्यक्ती चेतन चौधरी हा असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्याच्या चौकशीत विविध बाबी समोर आल्या असून पोलिसांकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपी अटकेत असून न्यायालायात हजर केले असता त्यांना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed