• Mon. Jun 29th, 2026

    फुलप्रूफ प्लान BFच्या एका चुकीनं फसला अन् सिया अडकली; ‘त्या’ फुटेजनं केतनच्या मृत्यूचा उलगडा

    फुलप्रूफ प्लान BFच्या एका चुकीनं फसला अन् सिया अडकली; ‘त्या’ फुटेजनं केतनच्या मृत्यूचा उलगडा

    Pune Crime: पुण्यातील लोहगड किल्ल्यावरुन पडून केतन अग्रवाल नावाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. हा मृत्यू अपघात नसून घातपात असल्याची माहिती आता उघडकीस आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: परदेशातून उच्च शिक्षण पूर्ण करुन मायदेशी परतलेला २४ वर्षांचा केतन अग्रवालचा शाही विवाह येत्या नोव्हेंबरमध्ये संपन्न होणार होता. त्यासाठी राजस्थानमधील जयपूरमध्ये एक भव्य राजवाडा बुक करण्यात आला होता. व्हिआयपी पाहुण्यांसाठी दोन चार्टर्ड विमानं बुक करण्यात आली होती. परदेशातून आलेला केतन वडिलांच्या बांधकाम व्यवसायात जम बसवत होता. केतनच्या घरी त्याच्या लग्नाची तयारी सुरू होती. मात्र त्यापूर्वीच त्याच्या सोबत घातपात झाला. त्याच्या होणाऱ्या पत्नीनंच त्याचा शेवट घडवून आणला.

    १९ जूनला केतनची होणारी पत्नी सिया गोयलचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी आदल्या दिवशी केतन आणि सिया १८ जूनला लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेले होते. त्याच दिवशी संध्याकाळी केतनच्या मृत्यूची बातमी आली. सेल्फी काढताना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तो ३५० फूट खोल दरीत कोसळला. केतनचा मृत्यू अपघात असल्याचा सुरुवातीला वाटत होतं. पण पोलीस तपासातून वेगळीच माहिती समोर आली. केतनला कट रचून पद्धतशीरपणे संपवण्यात आलं होतं. त्याच्या होणाऱ्या पत्नीनं म्हणजेच सिया गोयलनं कारस्थान रचून त्याचा शेवट केला आणि अपघाताचा बनाव रचला.

    Ketan Agarwal

    केतन अग्रवालच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी पोलिसांनी किल्ल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात पोलिसांना एक संशयित तरुण दिसला. त्याच्या हालचाली पाहून पोलिसांना शंका आली. मागील आठवड्यात लोणावळ्यात कडक ऊन पडलं होतं. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हात एक तरुण हुडी घालून फिरत होता. त्याच्या कानात हेडफोन होते आणि हुडीच्या मदतीनं त्यानं स्वत:चा चेहरा लपवला होता. रणरणत्या उन्हात हुडी घातलेला तरुण पाहून पोलिसांना शंका आली आणि तिथूनच तपासाला गती मिळाली.

    ketan

    पोलिसांनी संशयित तरुणाचा माग काढला आणि सियाचा कट उघडकीस आला. सियाचं केतन सोबत लग्न ठरलं होतं. पण तिला याचा आनंद नव्हता. तिनं एका मित्राला सोबत घेत केतनला संपवण्याचा कट रचला. १८ जूनला सिया ठरल्याप्रमाणे केतनला घेऊन लोहगडावर असलेल्या एका निर्जन कड्यावर गेली. आसपास कोणीही नसल्याचं पाहून सिया आणि तिच्या मित्रानं केतनला दरीत ढकललं. तब्बल ३५० फूट खोल दरीत कोसळल्यानं केतनचा मृत्यू झाला. Maharashtra TimesPune Crime: ट्रेकिंग, सेल्फी अन् निसर्गाचं ‘कव्हर’; सियानं केतनचा ‘राजा’ केला; 5 चक्रावून टाकणारे योगायोग
    अपघाताचा देखावा उभा करत सियानं पोलिसांची दिशाभूल केली. पण हुडी घातलेल्या मित्राच्या पेहराव्यानं सियाचा सगळा कट उघडकीस आला. सियाचे चेतन चौधरी नावाच्या तरुणाशी वर्षभरापासून प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाचं पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात दुकान आहे. सियाला केतन सोबत लग्न करायचं नव्हतं. म्हणून तिनं केतनचा जीव घेतला. चेतन आणि सिया यांनी मिळून केतनला संपवण्यासाठी कट रचला. त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

    मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

    ‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

    टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

    लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

    लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

    २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

    शैक्षणिक पात्रता
    कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा