• Sat. Aug 15th, 2026

रानभाजी महोत्सवाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन   – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 15, 2026

बीड, दि. १५ (जिमाका) :- जिल्ह्यात रानभाज्यांचे महत्त्व आणि त्यांचे औषधी गुणधर्म लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सव 2026 चे उद्घाटन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

रानभाजी महोत्सव 2026 चे आयोजन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरात करण्यात आले आहे. याच्या उदघाटनप्रसंगी आमदार विजयसिंह पंडित,  जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, तसेच जिल्हा कृषी अधिकारी सुभाष साळवे यांच्यासह कृषी व संबंधित यंत्रणेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी महोत्सवात लावण्यात आलेल्या विविध स्टॉल्सना भेट दिली. त्यांनी मराठवाड्यात प्रामुख्याने आढळणाऱ्या दुर्मिळ आणि पौष्टिक रानभाज्यांचे अत्यंत बारकाईने निरीक्षण केले. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत, मी मराठवाड्यात असताना यातील अनेक रानभाज्या आवडीने खाल्ल्या आहेत, अशी भावनिक आठवण त्यांनी बोलून दाखविली.

पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी महोत्सवात प्रदर्शित केलेल्या प्रत्येक रानभाजीचे औषधी उपयोग, जीवनसत्त्वे आणि आरोग्यासाठी असणारे गुणधर्म जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांच्याकडून सविस्तरपणे जाणून घेतले. रासायनिक खतांपासून दूर असलेल्या आणि नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या या भाज्या नागरिकांच्या आरोग्यासाठी कशा फायदेशीर आहेत, यावर त्यांनी चर्चा केली. रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना आणि तरुण पिढीला निसर्गाच्या या अनमोल ठेव्याची माहिती मिळण्यास मोठी मदत होणार आहे. रानभाजी महोत्सवाला बीडमधील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही पालकमंत्री सुनेत्रा अजित अजित पवार यांनी यावेळी केले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed