• Wed. Jun 24th, 2026
    Vidhan Parishad Election 2026: मराठवाड्यात महायुतीचाच बोलबाला! भाजपचे शिरसाठ, राजूरकर, बसवराज पाटील; तर शिवसेनेचे खान विजयी

    Vidhan Parishad Election Result 2026 : महायुतीचा विजय हा निश्चितच होता, अशी प्रतिक्रिया ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. निकाल घोषित होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

    विधान परिषद निवडणूक निकाल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : विधान परिषदेच्या मराठवाड्यातील चारही स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महायुतीचाच बोलबाला राहिला. भारतीय जनता पक्षाचे तीन, तर शिवसेनेचा एक उमेदवार या निवडणुकीत विजय झाला. विशेष म्हणजे सर्वच ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे मोठ्या फरकाने विजयी झाले. दुसरीकडे महाविकास आघाडीला कुठेही चमत्कार करून दाखवता आला नाही.

    औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सुहास शिरसाठ यांचा विजय झाला. त्यांना ४५५ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार गणेश लोखंडे यांना १३५ मते मिळाली. अपक्ष उमेदवार इसाक संदू खान यांना ३५ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी निकाल जाहीर केला.

    Maharashtra TimesGokul Gite : पक्षप्रवेश नाही; गोकुळ गिते शिंदेंच्या शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करणार
    नांदेडमध्ये राजूरकर विजयी
    नांदेड स्थानिक स्वराज मतदारसंघाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपचे अमरनाथ राजूरकर यांचा विजय झाला. त्यांनी ३३९ मताधिक्य मिळवत विजय संपादित केला. अपक्ष कृष्णा पाटील आष्टीकर यांना ८४, तर प्रशांत इंगोले यांना केवळ पाच मतांवर समाधान मानावे लागले. तर मतमोजणीत २३ मते अवैध ठरविण्यात आली.

    धाराशिवमध्ये फुलले कमळ
    विधान परिषदेच्या उस्मानाबाद– लातूर– बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत सोमवारी झालेल्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार बसवराज माधवराव पाटील यांनी विजय मिळविला. पाटील यांना एकूण ८४४ मते मिळाली,तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे महेश माणिकराव देशमुख यांना १२५ मते मिळाली. त्यामुळे बसवराज पाटील यांनी तब्बल ७१९ मतांच्या फरकाने विजय संपादन केला. या निवडणुकीत एकूण ९८३ मतपत्रिका प्राप्त झाल्या. त्यापैकी १४ मते अवैध ठरल्याने ९६९ वैध मते ग्राह्य धरण्यात आली. निवडून येण्यासाठी आवश्यक कोटा ४८५ मतांचा होता . बसवराज पाटील यांनी हा कोटा पार करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

    Maharashtra TimesMLC Election : सांगली-साताऱ्यात महायुतीचे तब्बल 100 मतं फुटली, नेमका निकाल काय?
    परभणीत शिवसेनेचे खान विजयी
    परभणी-हिंगोली मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार सईद खान शेरगुल खान विजयी झाले. त्यांना २४२ मते मिळाली. शिवसेना उबाठा पक्षाचे विवेक नावंदर यांना १५९, अपक्ष सुशीलकुमार देशमुख यांना ५६ मते मिळाली. आठ मते बाद झाली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा