• Fri. Jun 26th, 2026
    ओमराजेंचं सगळं आधीच ठरलेलं; परिषदेच्या निवडणुकीत मविआची 150 मतं फुटली; सगळी भाजपकडे वळली

    Omraje Nimbalkar: विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीनं १७ पैकी १६ जागा जिंकल्या. केवळ नाशिकची जागा अपक्ष उमेदवारानं जिंकली. तर मविआला भोपळा मिळाला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    धाराशिव: शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. मतदारसंघात जाऊन लोकांशी बोलून दोन दिवसांत निर्णय घेऊ, असं ठाकरेसेनेचे फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. पण विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल पाहता ओमराजे यांचा निर्णय आधीच झाला होता, ही बाब स्पष्ट झाली आहे. धाराशिव-लातूर-बीड विधान परिषद मतदारसंघातून भाजपच्या बसवराज पाटील यांनी बाजी मारली आहे. तर काँग्रेसचे महेश देशमुख यांचा पराभव झाला आहे. दोघांना मिळालेली मतं पाहिल्यास महाविकास आघाडीची मतं फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ओमराजेंचा पक्षांतरचा निर्णय आधीच झाला होता. त्यामुळेच मविआची मतं फुटली, अशी चर्चा आहे. विधान परिषदेची निवडणूक १८ जूनला झाली होती.

    धाराशिव-लातूर-बीड विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार बसवराज पाटील यांना ८४५ मतं मिळाली. तर १४ मतं बाद ठरवली गेली. काँग्रेसच्या महेश देशमुख यांना केवळ १२४ मतं मिळाली. बसवराज पाटील तब्बल ७२१ मतांनी विजय झाले. विधान परिषदेच्या १७ पैकी १६ जागा महायुतीनं जिंकला. त्यात सर्वाधिक मताधिक्क्यानं बसवराज पाटीलच निवडून आले. ओमराजेंकडून दगा झाल्यानं या निवडणुकीत मविआची १५० मतं फुटल्याचा अंदाज आहे.
    Maharashtra TimesOmraje Nimbalkar: निकालानंतर ओमराजे उद्धव अन् आदित्य ठाकरेंबद्दल बोलले; जिवलग मित्र मातोश्रीवर, प्लान ठरला
    काँग्रेसचे दिवंगत नेते आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल शनिवारी (२० जून) सुनावण्यात आला. तब्बल २० वर्षे ओमराजे आणि त्यांचं कुटुंब या प्रकरणात न्यायालयात लढा देत होतं. पण त्यांच्या पदरी निराशा पडली. या खटल्यातील सर्वच्या सर्व ९ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. निकालानंतर बोलताना ओमराजेंनी निराशा व्यक्त केली. सध्या कलियुग असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. वडिलांच्या हत्येच्या खटल्याचा निकाल आणि माझा राजकीय निर्णय (पक्षांतर) याचा संबंध नसल्याचं ओमराजेंनी म्हटलं. शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. मतदारसंघात जाऊन जनतेशी बोलू आणि मग २ दिवसांत निर्णय घेऊ असं विधान ओमराजेंनी केलं होतं.
    Maharashtra TimesOmraje Nimbalkar: विरोधात निकाल, ओमराजेंचं वेट अँड वॉच; ठाकरेसेनेनं फिल्डींग लावली, ‘ऑपरेशन टायगर’ धोक्यात
    विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल पाहता, धाराशिव-लातूर-बीड विधान परिषदेतील मतांचा आकडा ओमराजेंनी मविआची मतं भाजप उमेदवाराकडे वळवल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पक्षांतराचा निर्णय ओमराजेंनी आधीच घेतला होता. त्यानुसार त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराला निवडणुकीत मदत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ओमराजे यांच्यासह ठाकरेसेनेचे सहा खासदार आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते आपली भूमिका मांडतील आणि शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय जाहीर करतील, अशी शक्यता आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

    मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

    ‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

    टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

    लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

    लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

    २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

    शैक्षणिक पात्रता
    कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा