• Sat. Aug 15th, 2026

गोंदियाला विकसित जिल्हा बनविण्यासाठी एकत्रितपणे योगदान देऊया – पालकमंत्री इंद्रनील नाईक – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 15, 2026

गोंदिया, दि. १५ : गोंदिया जिल्ह्याला सर्वसमावेशक, सक्षम आणि विकसित जिल्हा बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान देऊया असे आवाहन उद्योग, सार्वजनिक बांधकाम, तंत्र व उच्च शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात केले.

पोलीस मुख्यालय मैदान कारंजा येथे राष्ट्रध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी मंदार पत्की, मुख्य कार्यकारी अधिकारी झेनीत दोन्तुला, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, अपर जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग उपस्थित होते. यासह विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, नागरिक, पत्रकार, शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री श्री. नाईक यांनी यावेळी दिली. जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत 438 कोटी 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून हा निधी शेती, सिंचन, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यटन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री नाईक यांनी सांगितले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील सुमारे 30 हजार शेतकऱ्यांना मिळणार असून, पहिल्या टप्प्यात 12 हजार 679 शेतकऱ्यांच्या खात्यात 75.74 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

खरीप हंगामात भात लागवडीसाठी 74 हजार 613 हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून कृषी विभागाकडून सुधारित तंत्रज्ञानाचा प्रसार केला जात आहे. धान खरेदी केंद्रांमार्फत 1.98 लाख शेतकऱ्यांकडून 75.57 लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून 1,569.12 कोटी रुपयांचे चुकारे वितरित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

पर्यटन विकासावर भर देताना हाजराफॉलच्या विकासकामांचा उल्लेख करण्यात आला. यावर्षी जूनअखेरपर्यंत 8,500 हून अधिक पर्यटकांनी या पर्यटनस्थळाला भेट दिली. याशिवाय सारस पक्ष्यांच्या गणनेत 32 सारस पक्ष्यांची नोंद झाल्याने जिल्ह्याच्या जैवविविधतेचा गौरव वाढल्याचे त्यांनी नमूद केले.

आरोग्य क्षेत्रात गोंदिया जिल्ह्याने क्षयरोग निर्मूलनात सलग दुसऱ्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याचा उल्लेख करण्यात आला. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 7.37 लाख आयुष्मान कार्ड आणि 9.90 लाख आभा कार्ड वितरित करण्यात आली आहेत.

ग्रामीण रोजगारासाठी व्ही.बी. जी-राम-जी अभियानांतर्गत 17.88 लाख मनुष्यदिवसांची निर्मिती करण्यात आली असून पात्र कुटुंबांना 125 दिवसांपर्यंत रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यावेळी पालकमंत्र्यांनी 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान “जलसंधारण सप्ताह” उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या भावनेतून जिल्ह्याची वाटचाल करूया असे आवाहन पालकमंत्री  नाईक यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे नियोजन निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. सुत्रसंचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले. कार्यक्रमास माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे व जि.प. बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत उपस्थित होते.

०००

क्षणचित्रे:                                                                                                                                                                       • पोलीस विभाग व अन्य असे एकूण 11 विभागाने पथसंचलनात भाग घेतला.

  • उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आरोग्य सेविका राजश्री भोंडे (नेवारे) यांचा सत्कार.
  • महा वॉकेथॉन 2026-वॉक फॉर वॉटर लोगोचे विमोचन.
  • 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान सुरु असलेल्या जलसंधारण सप्ताहअंतर्गत …चला माती वाचवू… पाणी जपू… जलसमृध्द महाराष्ट्र घडवू अशी शपथ घेतली.
  • पोलीस विभागात दिर्घकालीन व निष्कलंक सेवा दिल्याबद्दल 15 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेल्या प्रातिनिधिक स्वरुपात 5 शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed