• Tue. Jun 23rd, 2026

    ६४ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाच्या विभागीय पारितोषिक वितरण सोहळ्यात रंगकर्मींचा होणार सन्मान – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 22, 2026
    ६४ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाच्या विभागीय पारितोषिक वितरण सोहळ्यात रंगकर्मींचा होणार सन्मान – महासंवाद

    मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६४ वा महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव विभागीय पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार, ३० जून २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.

    या सोहळ्यात ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा, प्राथमिक फेरी, २२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा, प्राथमिक फेरी; तसेच प्रथम मराठी एकांकिका स्पर्धा, प्राथमिक फेरीतील पारितोषिक विजेत्या कलाकारांचा गौरव करण्यात येणार आहे.

    महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव हा राज्याच्या समृद्ध आणि वैभवशाली रंगभूमी परंपरेचा गौरव करणारा महत्त्वपूर्ण सांस्कृतिक उपक्रम आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांतील नाट्य संस्था, कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञ यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध होऊन मराठी नाट्य परंपरेच्या जतन व संवर्धनास चालना मिळत आहे.

    नाट्यकला ही समाजातील विविध भावना, विचार आणि सामाजिक वास्तवाचे प्रभावी चित्रण करणारे माध्यम असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. हौशी नाट्य, बालनाट्य आणि एकांकिका या माध्यमातून नवोदित कलाकारांना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळत असून राज्यातील नाट्य चळवळीला नवी ऊर्जा प्राप्त होत आहे.

    या पारितोषिक वितरण समारंभामध्ये अभिनय, दिग्दर्शन, लेखन, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत आणि विविध तांत्रिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकार, बालकलाकार आणि नाट्य संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. या गौरवामुळे कलाकारांच्या सर्जनशील कार्याला प्रोत्साहन मिळून नाट्य क्षेत्रात उत्कृष्टतेचा नवा आदर्श निर्माण होण्यास मदत होणार आहे.

    महाराष्ट्राची समृद्ध नाट्यपरंपरा जपणाऱ्या आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचविणाऱ्या या महोत्सवामुळे रंगभूमीवरील नव्या प्रयोगांना व नवोदित कलावंतांना प्रोत्साहन मिळत आहे. विविध विभागांमधून निवड झालेल्या कलाकारांच्या कलात्मक प्रवासाचा गौरव हा या सोहळ्याच्या माध्यमातून केला जाणार आहे.

    हा कार्यक्रम  सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे, अभिजात कला, लोककला आणि थोर कलावंतांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

    सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित करण्यात येणारे राज्य नाट्य महोत्सव, विविध स्पर्धा आणि पारितोषिक वितरण सोहळे हे कलाकारांच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणारे महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहेत. अशा उपक्रमांमुळे राज्यातील नाट्य संस्कृती अधिक समृद्ध आणि व्यापक होत आहे.

    या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून नाट्यप्रेमी, कलाकार, रंगकर्मी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या गौरव सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

    0000

    संजय ओरके/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed