• Tue. Jun 23rd, 2026
    Maharashtra Monsoon Session 2026: विरोधकांची कसोटी! आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन; कोणते मुद्दे गाजण्याची शक्यता?

    Maharashtra Monsoon Session 2026: खासदारांपाठोपाठ उबाठा पक्षाच्या आमदारांची, तसेच शरद पवार राष्टवादीच्या खासदारांच्याही फु्टीची टांगती तलवार विरोधकांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांशी एकीकडे दोन हात करताना, दुसरीकडे फोडाफोडीच्या राजकारणाचा जाब विचारण्यासाठी विरोधकांना आवाज उठवावा लागणार आहे.

    पावसाळी अधिवेशन.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    संजय व्हनमाने, मुंबई : पावसाने दडी मारल्याने राज्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, पाणीटंचाई, शेतकरी कर्जमाफी अशा सर्व मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची आयती संधी एकीकडे विरोधी पक्षाला मिळणार असली तरी दुसरीकडे ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून शिवसेना उबाठा संसदीय पक्षात फूट पाडण्यात शिवसेनेला यश आल्याने विरोधकांची झोप उडाली आहे.

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या घोषणेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती ’ योजना जाहीर केली आहे. मात्र, या योजनेतील अटी-शर्ती जाचक असल्याची टीका होत असून, विरोधी पक्षाने सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. दुसरीकडे पावसाने ओढ दिल्याने राज्यावर पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या चिंतेचे ढग आहेत. जूनचा चौथा आठवडा उजाडला तरी पावसाची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. संभाव्य दुष्काळी स्थिती आणि पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून लावून धरली जाणार आहे.

    Maharashtra TimesBest Employees : बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! हंगामी पगारवाढ मंजूर अन् ग्रॅच्युइटीची घोषणा
    गेल्या महिन्यात पिंपरी- चिंचवड परिसरात हातभट्टीची विषारी दारू प्यायल्याने २२ जण दगावले. या घटनेने राज्यात राजरोस सुरू असलेल्या हातभट्टीच्या दारूचा प्रश्न समोर आला आहे. या दुर्घटनेवरून विरोधी पक्षाकडून गृह आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याला लक्ष्य करणार आहे. निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल जाहीर न करता अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. या उपवर्गीकरणाला अनुसूचित जातीतील बहुसंख्य घटकांचा विरोध असून, सरकारच्या विरोधातील रोष अधिवेशनात प्रकट होण्याची शक्यता आहे.

    विधान परिषदेच्या उपसभापतींची निवड होणार?
    या अधिवेशनात विधान परिषदेच्या नव्या उपसभापतींची निवड अपेक्षित आहे. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणूक निकालाची अधिसूचना जारी झाल्यानंतर नव्या उपसभापती निवडीची प्रक्रिया सुरू केली जाईल. माजी उपसभापती डॉ. नीलम गोहे यांची विधान परिषदेची मुदत गेल्या महिन्यात संपल्याने उपसभापती पद सध्या रिक्त आहे. डॉ. गोहे विधान परिषदेवर पुन्हा निवडून आल्याने उपसभापती पदावर त्यांची वर्णी लावली जाण्याची शक्यता दाट आहे.

    Maharashtra TimesRaj Thackeray : ‘काही म्हणतात दोस्ती तुटायची नाही, काही म्हणतात थांबायचं नाही’, राज ठाकरेंचं मिश्किल वक्तव्य
    पुरवणी मागणीत कर्जमाफीची तरतूद
    विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सन २०२६-२७ या वर्षातील पुरवणी मागण्या सादर केल्या जातील. पुरवणी मागणीत शेतकरी कर्जमाफीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे. या पुरवणी मागण्यांवर अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे २९ आणि ३० जून रोजी चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील.

    ‘कोचिंग’ विधेयकाला मुहूर्त?
    मुंबई : राज्यातील कोचिंग क्लासच्या नियमनासाठी गेली दोन दशके चर्चेत असलेल्या स्वतंत्र कायद्याला अखेर यंदाच्या पावसाळी अधिवेशनात मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. आज, सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात कोचिंग क्लास नियमन विधेयक सादर करण्यात येणार असल्याचे संकेत शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिले. विद्यार्थ्यांची किमान संख्या, सुरक्षेचे निकष, शुल्क आकारणी, पायाभूत सुविधा, तसेच क्लासच्या वेळांबाबत स्पष्ट नियमावली या विधेयकात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा