Monsoon Update: हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार मान्सूनची प्रगती पुन्हा सुरू होणार असून २३ जूनपर्यंत राज्यात पावसाच्या सरी कोसळतील. सोमवारपासून मुंबई महानगर प्रदेशात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
उकाड्यापासून दिलासा मिळणार का?
२३ जूनच्या सुमारास महाराष्ट्राचा आणखी काही भाग, यासोबतच तेलंगण, ओडिशा, झारखंड, बिहार, छत्तीसगडचा काही भाग येथे मान्सून दाखल होईल, अशी शक्यता आहे. महाराष्ट्रातील मान्सूनचा प्रवास हर्णे, सोलापूरपलीकडे सरकलेला नाही. वातावरणामध्ये आर्द्रता आहे, मात्र मान्सूनच्या वाऱ्यांना चालना मिळत नसल्याने आर्द्रतेमुळे आणि पावसाच्या अभावामुळे तापमान आणि उकाड्याची तीव्रता प्रचंड वाढलेली आहे. जूनचे २० दिवस उलटून गेले, तरी मान्सून पूर्वसरींनीही महाराष्ट्राला फारसा दिलासा दिलेला नाही. त्यामुळे मान्सून दाखल झाल्यावर तरी हा दिलासा मिळणार आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भारतीय हवामान विभागाने गुरुवारी पुढील दोन आठवड्यांसाठीचे पूर्वानुमान जारी केले होते. यानुसार २५ जूनपर्यंत पावसाचा जोर फारसा वाढलेला नसेल. कोकणामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. हा जोर दक्षिण कोकणात अधिक असण्याची शक्यता आहे. २५ जून ते २ जुलै या कालावधीत महाराष्ट्रातील मान्सूनचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. या काळात उत्तर कोकणातही २५ जूनपर्यंतच्या आठवड्यापेक्षा पावसाचा जोर अधिक असू शकेल. हा पाऊस त्या आठवड्याच्या सर्वसाधारण सरासरीपेक्षा कमी असेल, असाही अंदाज आहे. हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या विविध मॉडेलच्या सध्याच्या अंदाजानुसार सोमवारपासून मुंबई आणि पुण्यात पाऊस अनुभवता येईल, अशी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय हवामान विभागाच्या हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे माजी प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
प्रादेशिक हवामान विभागाने २२ ते २४ जून या कालावधीत मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा यलो ॲलर्ट दिला आहे. या कालावधीत दोन्ही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकेल. मात्र मेघगर्जना, तसेच विजांचा कडकडाट होऊ शकतो, असे प्रादेशिक हवामान विभागाने स्पष्ट केले. रायगड आणि रत्नागिरीमध्येही हलका ते मध्यम पाऊस या कालावधीत पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गमध्ये मात्र २३ आणि २४ जून रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.
पुण्यात मंगळवारपासून पावसाची शक्यता
पुणे शहरात पुढील दोन दिवसांत तापमानात थोडी घट होणार असून, मंगळवारपासून मेघ गर्जनेसह पुण्यात पाऊस पडणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केली. रविवारी मुख्यतः आकाश निरभ्र राहणार असून, दुपारनंतर ढगाळ राहणार आहे. जून महिन्याचे तीन आठवडे उलटले तरी पुण्यात पाऊस पडलेला नाही. उकाड्यापासून सुटका दूरच, दुपारी रस्त्यावरून फिरताना उन्हाचे चटके बसत आहेत. तापलेले वातावरण बदलण्यासाठी पुणेकरांना सध्या पावसाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळी शहरात काही वेळ आकाश ढगाळ होते, वाराही सुटला होता, त्यामुळे आज पाऊस पडणार, अशी नागरिकांमध्ये चर्चाही झाली; पण दुपारी बारानंतर आकाश पुन्हा निरभ्र झाले आणि उन्हाची तीव्रता वाढली. दोन दिवसांच्या तुलनेत पुन्हा तापमानात वाढ होऊन सरासरीपेक्षा ६.३ अंशाने वाढून ३६.७ अंश सेल्सिअस कमाल आणि किमान तापमानात थोडी घट होऊन २३.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. शहरात मंगळवारपासून वातावरणात बदल होणे अपेक्षित आहे. २३ ते २५ जून दरम्यान दुपारनंतर आकाश ढगाळ राहून मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ‘आयएमडी’ने व्यक्त केली आहे.
Monsoon Update : पावसाने दडी मारली, देशभर हाहाकार; मान्सूनच्या विलंबामागे ‘सोमाली जेट’ हे कारण; आता फक्त ‘या’ तारखांवरच आशा
उत्तर महाराष्ट्रात तब्बल ९० टक्केपावसाची तूट
यंदा जून महिना संपत आला तरी उत्तर महाराष्ट्रात मान्सून सक्रिय न झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर या पाचही जिल्ह्यांमध्ये २० जूनपर्यंत तब्बल ४०९.७ मिमी (अंदाजे ४१० मिमी) पावसाची एकूण तूट नोंदवण्यात आली आहे. दरवर्षी या कालावधीत उत्तर महाराष्ट्रात एकूण ४५५.८ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र, यंदा अवघा ४६.१ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत तब्बल ९० टक्के पाऊस कमी झाल्याने उत्तर महाराष्ट्रावर चिंतेचे मळभ दाटले आहेत.
