What Is Somali Jet : केरळमध्ये मान्सून ४ तारखेला दाखल झाला. त्यानंतर तो महाराष्ट्रात आणि तेलंगणात दाखल होणं अपेक्षित होतं, पण त्यापूर्वी तो गायब झाला. सगळ्या उत्तर भारतात खरीप पिकांची पेरणी त्यामुळे लांबली आहे, त्याशिवाय उकाड्याने त्रस्त जनसामान्यानांही पावसाची प्रतिक्षा लागलेली होती, पण सर्वकाही विस्कटले, पावसाचे सगळे अंदाज कसेकाय खोटे ठरले असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
काय आहे सोमाली जेट?
सोमाली जेट ही एक विषुववृत्तीय वायु प्रणाली आहे जी आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळ हिंद महासागरात तयार होते. भारताच्या मान्सूनसाठी महत्त्वाची असलेली सोमाली जेट ‘फाईंडलेटर जेट’ या नावानेही ओळखली जाते. सोमाली जेटमुळे पूर्व आफ्रिकेत तुलनेने कमी पाऊस पडतो. सोमाली जेट हा एक निम्नस्तरीय वायुप्रवाह आहे जो भारतात नैऋत्य मान्सून आणण्यास मदत करतो. सोमाली जेट कमकुवत झाला तर भारतातील मान्सूनही कमकुवत होतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या प्रणालींचाही अभाव आहे, ज्या सहसा मान्सूनला अनेक भागात ढकलण्यास मदत करत असतात. तसेच यावेळी एल निनोमुळे मान्सून कमकुवत होण्याची भीती हवामानशास्त्रज्ञ वारंवार व्यक्त करत आहेत.
१ ते १९ जून पर्यंत ४० टक्के कमी पाऊस
हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीत १ जून ते १९ जून दरम्यान देशात सरासरीपेक्षा ४० टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. सहसा, १ जून ते १७ जून दरम्यान देशात सरासरी ८०.६ मिमी पाऊस पडतो, परंतु या वर्षी आतापर्यंत केवळ ४८.५ मिमी पाऊस पडला आहे. मध्य भारतात ०१ जून ते १८ जून दरम्यान सरासरीपेक्षा ६३ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.
२३ जूनपर्यंत छत्तीसगडला पोहोचेल
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आता २३ जूनपर्यंत छत्तीसगडमध्ये पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये मान्सूनने वेग धारण केला आहे.
पाणी पुरवठ्यावर परिणाम
मान्सूनने पाठ फिरवल्यामुळे महाराष्ट्रात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पुण्यात सम-विषम पाणीपुरवठा प्रणाली लागू करण्यात आली आहे. मुंबईत उकाड्यामुळे हैराण नागरिक रात्रीच्यावेळी समुद्रकिनाऱ्यावर जात आहेत. मुंबईत ११ जून रोजी पावसाचे आगमन अपेक्षित होते, परंतु तसे अद्याप झालेले नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ ते २३ जून दरम्यान पश्चिम मध्य प्रदेशात मेघगर्जनेसह पाऊस आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्रातील विदर्भात १९ ते २३ जून दरम्यान असेच हवामान अपेक्षित आहे.
खरीप हंगामाला उशीर
महाराष्ट्रात मान्सूनने उशिर केल्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच त्याचा परिणाम दिसू लागला आहे. राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, जून महिन्याच्या मध्यापर्यंत राज्यात केवळ १ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. साधारणपणे या वेळेपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये पेरणीचे काम वेगाने सुरू असते, परंतु पाऊस गायब असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत आणि पावसाकडे लक्ष ठेऊन आहेत.
