• Wed. Jun 17th, 2026

    Mumbai Metro : बळीराजासाठी मुंबई मेट्रो फायदेशीर! दुग्धजन्य पदार्थांना मोठी बाजारपेठ मिळणार

    Mumbai Metro : बळीराजासाठी मुंबई मेट्रो फायदेशीर! दुग्धजन्य पदार्थांना मोठी बाजारपेठ मिळणार

    मुंबई मेट्रो आता राज्यातील ग्रामीण शेतकऱ्यांसाठी देखील फायदेशीर ठरणार आहे. कारण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी तयार केलेल्या दर्जेदार दुग्धजन्य पदार्थांचे स्टॉल आता मुंबई मेट्रो स्थानकांवर सुरु होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिल्या स्टॉलचे उद्घाटन आज झाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : ग्रामीण भागातील दुग्धजन्य पदार्थ आणि अन्य कृषी उत्पादने मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘मुंबई मेट्रो’ हे मोठे आणि प्रभावी माध्यम आहे. यामुळे निश्चितच ग्रामीण भागातील उत्पादनांना मुंबईमध्ये हक्काची बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्टेशन स्थानकावर वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्या दुग्धजन्य पदार्थ विक्री स्टॉलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दुग्धविकास मंत्री अतुल सावे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे (सावकर), मुंबई महापालिका आयुक्त तथा मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे,तसेच वारणा सहकारी दूध उत्पादक संघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मुंबई मेट्रो-3 ही शहराची नवी जीवनवाहिनी आहे. आशियातील सर्वात लांब एकेरी भूमिगत मेट्रो आहे. ही मेट्रो केवळ वाहतुकीची सुविधा नसून आर्थिक विकासालाही चालना देणारे व्यासपीठही आहे. मेट्रो स्थानकांवर उभारण्यात आलेल्या व्यावसायिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील उत्पादने थेट शहरी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी निर्माण झाली आहे.”

    “कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तयार केलेले दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ आता मुंबईसारख्या बाजारपेठेत या स्टॉलच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अधिक चांगली बाजारपेठ मिळण्याबरोबरच ग्राहकांनाही दर्जेदार उत्पादने सहज उपलब्ध होणार आहेत. मेट्रो स्थानकांवरील अशा उपक्रमांमुळे रोजगारनिर्मिती, व्यापारवृद्धी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे”, असं मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    Mumbai Metro

    मेट्रो स्थानकावर सुरू झालेला वारणा स्टॉल हा केवळ व्यावसायिक उपक्रम नसून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारणा समूहाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. वारणा समूहाने दुग्ध व्यवसायाबरोबरच शेतकरी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेले कार्य देशासाठी आदर्श असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारणा परिवाराचे अभिनंदन केले.

    आमदार कोरे म्हणाले की, वारणा समूहाच्या वतीने सुमारे दीड लाख शेतकरी उत्पादकांकडून दररोज दूध संकलित केले जाते आणि त्याचा मोबदला नियमितपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविला जातो. या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दुग्धजन्य पदार्थांना मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत थेट प्रवेश मिळावा, यासाठी मेट्रो स्थानकांवरील स्टॉल महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. मुंबईच्या ग्राहक वर्गाला दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देतानाच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळ देण्याचे काम या स्टॉलच्या माध्यमातून होणार आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा