• Sun. Jun 14th, 2026

    Aqua Lineवर मिळणार ‘मोबाइल नेटवर्क’! भुयारी मेट्रोच्या 16 स्थानकांत सेवा सुरू; उर्वरित स्थानकांतही काम प्रगतिपथावर

    Aqua Lineवर मिळणार ‘मोबाइल नेटवर्क’! भुयारी मेट्रोच्या 16 स्थानकांत सेवा सुरू; उर्वरित स्थानकांतही काम प्रगतिपथावर

    Mumbai Metro 3: भुयारी मेट्रोतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई मेट्रो 3वर अनेक महिन्यांपासून रखडलेली नेटवर्क सेवा अखेर सुरू झाली आहे. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्हीआय या तिन्ही प्रमुख कंपन्यांनी काम सुरू केलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मेट्रो-३च्या भुयारी मार्गावर प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आता मोबाइलवर ‘हॅलो’ बोलून विनाअडथळा बाहेरच्या दुनियेशी संवाद साधता येणार आहे. व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेल यांनी आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक या मार्गावरील स्थानकांमध्ये मोबाइल नेटवर्क सेवा सुरू केली आहे. भुयारी २७ मेट्रो स्थानकांपैकी १६ स्थानकांत मोबाइल नेटवर्क सुरू झाले असून उर्वरित स्थानकांत टप्प्याटप्प्याने ही सेवा सुरू होणार आहे.

    मेट्रो-३मध्ये तांत्रिक बिघाड

    भुयारी मेट्रो सुरू झाल्यापासून नेटवर्कअभावी प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. बोगद्यात प्रवेश केल्यानंतर कॉल अचानक खंडित होणे, इंटरनेट सेवा बंद पडणे, ऑनलाइन बैठका आणि कार्यालयीन कामकाजात व्यत्यय येणे, तसेच यूपीआय व्यवहार अडकणे अशा तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. विशेषतः विमानतळावरून प्रवास करणारे आणि बीकेसीसारख्या व्यावसायिक केंद्रांमध्ये काम करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी समस्या ठरत होती. २२ मे रोजी मेट्रो-३मध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाच्या वेळी नेटवर्क नसल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधता न आल्याने या सुविधेची गरज अधिक तीव्रतेने जाणवली होती.

    Maharashtra TimesNashik Metro: 8 वर्षांनंतर ‘नियो मेट्रो’ रद्द, मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये नियमित मेट्रोचा विचार; मंत्रालयात बैठक

    या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल)ने भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया या दूरसंचार कंपन्यांना भूमिगत स्थानके आणि बोगद्यांमध्ये ‘इन-बिल्डिंग सोल्यूशन्स’ प्रणाली उभारण्याची, तसेच तिचे संचालन आणि देखभाल करण्याची जबाबदारी दिली आहे. या तंत्रज्ञानामुळे स्थानके आणि बोगद्यांमध्ये अखंड व्हॉइस व डेटा कनेक्टिव्हिटी मिळत आहे. तर, जिओने आवश्यक सर्वेक्षण पूर्ण केले असून, लवकरच नेटवर्क उभारणीचे काम सुरू होणार आहे. जुलैपर्यंत संपूर्ण अॅक्वा लाइनवर जिओची सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

    प्रवाशांना आता भुयारी मेट्रोतही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी संपर्क साधणे शक्य होणार आहे.

    या स्थानकांमध्ये नेटवर्क सेवा सुरू

    आरे जेव्हीएलआर, सीप्झ, मरोळ एमआयडीसी-अंधेरी, नाका, सीएसएमआय विमानतळ टर्मिनल-२, सहार रोड, सीएसएमआय विमानतळ टर्मिनल-१, सांताक्रूझ, वांद्रे कॉलनी, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), धारावी, शितलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक, वरळी आणि आचार्य अत्रे चौक या १६ स्थानकांमध्ये व्होडाफोन आयडियाची सेवा सुरू झाली आहे. एअरटेलची सेवा सध्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी या १० स्थानकांवर सुरू झाली असून उर्वरित स्थानकांवरही ती टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहे.

    Maharashtra TimesMumbai Metro: मान्सूनमध्ये सुरु राहणार मुंबईतील चारही मेट्रो सेवा, पाच गाड्या राखीव ठेवणार; बिघाड टाळण्यासाठी उपाययोजना

    पुढील टप्पा : कुलाबा ते सीप्झ

    सायन्स सेंटर, महालक्ष्मी, जगन्नाथ शंकर शेठ, ग्रँट रोड, गिरगाव, काळबादेवी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड या उर्वरित ११ स्थानकांमध्येही पुढील काही आठवड्यांत मोबाइल नेटवर्क सुविधा सुरू होणार आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर कुलाबा ते सीप्झ या संपूर्ण ३३.५ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गावर प्रवाशांना अखंड मोबाइल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा लाभमिळणार असून मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा