• Fri. Jun 12th, 2026

    NCP Party 27th Foundation Day : तटकरे-भुजबळ यांच्यात शाब्दिक जुगलबंदी, वर्धापन दिनाच्या भाषणात टोले अन् टोमणे

    NCP Party 27th Foundation Day : तटकरे-भुजबळ यांच्यात शाब्दिक जुगलबंदी, वर्धापन दिनाच्या भाषणात टोले अन् टोमणे

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आज सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात चांगलीच शाब्दिक जुगलबंदी बघायला मिळाली. तटकरे यांनी भुजबळांना कबड्डीचे खेळाडू म्हटलं. तर भुजबळांनीदेखील राजकारणाचा खेळ करु नका, असं प्रत्युत्तर दिलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुंबईत पक्षाचा जंगी कार्यक्रम पार पडला. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व दिग्गज नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलीच शाब्दिक जुगलबंदी बघायला मिळाली. छगन भुजबळ हे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक होते. पण आपण राज्यसभेला गेलो तर पुतणे समीर भुजबळ यांना मंत्रिपद द्यावं, अशी मागणी त्यांची होती. त्यांची ही मागणी मान्य झाली नाही आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राजेंद्र जैन यांना राज्यसभेची संधी मिळाली.

    यावरुन छगन भुजबळ हे नाराज झाले होते. त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर याबाबत नाराजी व्यक्त करत आपण कबड्डीचे खेळाडू असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याची रि सुनील तटकरे यांनी आजच्या कार्यक्रमात ओढली. यावर भुजबळांनीदेखील प्रत्युत्तर दिलं.

    सुनील तटकरे काय म्हणाले?

    “भुजबळ साहेब सिनेनिर्माते आहेत, सिनेकलाकारही आहेत, कबड्डीचे खेळाडू आहेत, आता इथे बसलेल्या अनेकांना कबड्डी कळत असेल, तुमच्यासारखा चतुरस्त्र कबड्डी खेडाळू ज्यावेळेला जातो त्यावेळी एका वेळेला एखादा खेळाडू बाद करतो, कधी नव्या नियमाप्रमाणे बोनस घेऊन येतो, कधी नुसता जातो आणि परत येतो, कधी इतका खोलवर डाव खेळतो की, एकदा जातो आणि सहाही जणांना घेऊन येतो”, असा टोला सुनील तटकरे यांनी लगावला. त्यावर भुजबळांनी आपल्या भाषणात प्रत्युत्तर दिलं.

    छगन भुजबळ काय म्हणाले?

    “पक्षापेक्षा कुणी मोठं नाही. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता मगासपासून चाललंय बुद्धीबळ खेळतो, कबड्डी खेळतो, खो-खो खेळतो. अरे बाबा खेळात राजकारण आणू नका आणि राजकारणाचा खेळ करु नका. पक्षापेक्षा कुणी मोठं नाही. पक्ष म्हणजे फक्त झेंडा नाही. पक्ष म्हणजे केवळ ऑफिस आणि त्यावर लावलेलं बोर्ड नाही. पक्ष म्हणजे तुम्ही, आम्ही, कार्यकर्त्यांचा मोठा समूह म्हणजे पक्ष. आपल्याला पक्ष मोठा करायचा आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.

    “आम्ही ज्या निष्ठा अजितदादांच्या चरणी व्हायल्या होत्या, त्याच निष्ठा आता आम्हाला सुनेत्राताईंच्या चरणी वाहायच्या आहेत. सुनेत्राताईंच्या रुपाने आपण अजितदादांनाच आठवणीत ठेवायचं आहे की, हे अजित दादा आहेत. त्यांनी असं काम केलं होतं. आपल्याला हे काम करायचं आहे. कुठे संकटं निर्माण झाली तर अगोदर पुढे लढण्याची तयारी ठेवा”, असं आवाहन भुजबळांनी केलं.

    “मी काय बोलू, तो बोलेल असं करु नका. तर नाही, आम्ही आधी बोलणार. मतभेद असू शकतात. पण मनभेद नाहीत. आज आपण महायुतीत काम करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर, अहिल्याबाई होळकर यांच्या मार्गाने आपण पुढे जात आहोत. दुसरं आणखी लक्षात ठेवा. ही पदं आडवावरचं पाणी असतं. ते कधी निष्ठून जाईल याचं सांगता येत नाही. मनाने कार्यकर्ता जिवंत असला पाहिजे. संघर्ष आपला वारसा आहे. समर्पण आपली ओळख झाली पाहिजे”, असं भुजबळ म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा