• Sat. Jun 13th, 2026
    Railway Update: नोकरदार, विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! जालना-छत्रपती संभाजीनगरदरम्यान फेऱ्या मारणारी शटल रेल्वे धावणार, जिल्हा प्रशासनाचा मोठा पुढाकार

    जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. स्वतंत्र शटल किंवा डेमू रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाकडे जाणार आहे. मंजुरी मिळाल्यास हजारो प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सोयीस्कर होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जालना : जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान रोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या मार्गावरील वाढती प्रवासी संख्या आणि सध्याच्या रेल्वे वेळापत्रकामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन जालना-छत्रपती संभाजीनगरदरम्यान स्वतंत्र शटल किंवा डेमू रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून रेल्वे विभागाला पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे.

    वेळेवर गाडी नसल्याच्या तक्रारी

    जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन शहरांदरम्यान दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, खासगी क्षेत्रातील कर्मचारी, उद्योजक, व्यापारी आणि कामगार प्रवास करतात. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या रेल्वेगाड्यांच्या वेळा प्रवाशांच्या गरजेनुसार नसल्याची तक्रार वारंवार होत आहे. काही गाड्या पुढे कल्याणच्या दिशेने जात असल्याने स्थानिक प्रवाशांना त्याचा अपेक्षित फायदा होत नाही.

    मागणीचा जोर वाढला आणि प्रशासनाने दखल घेतली

    याच पार्श्वभूमीवर नुकतीच स्थानिक उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावर स्वतंत्र रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी जोरदारपणे मांडण्यात आली. दैनंदिन प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने या मागणीची दखल घेत तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.

    सध्या कोणत्या ट्रेन सुरु आहेत?

    दरम्यान, जालना ते छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दरम्यान दररोज अनेक एक्सप्रेस आणि वंदे भारत सारख्या वेगवान गाड्या उपलब्ध असून, ६३ किमीचे अंतर १ ते १.५ तासात पार करता येते. मराठवाडा एक्सप्रेस, तपोवन आणि अजंता एक्सप्रेस यांसारख्या प्रमुख गाड्या पहाटेपासून रात्रीपर्यंत दर २-३ तासांनी या मार्गावर धावतात.

    निर्णयाकडे प्रवाशांचे लक्ष

    प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून दक्षिण मध्य रेल्वेकडून यावर काय निर्णय घेतला जातो, याकडे आता जालना आणि छत्रपती संभाजीनगरमधील हजारो प्रवाशांचे लक्ष लागले आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास दोन्ही शहरांतील दैनंदिन प्रवास अधिक सुलभ आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा