• Sat. Jun 13th, 2026
    Sunetra Pawar : कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप खपवून घेणार नाही, सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; मंत्र्यासह पदाधिकाऱ्यांना इशारा

    सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी केलेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आणि नेत्यांचे चांगलेच कान टोचले. पक्षाचे कामकाज पाहत असताना कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असा सूचक इशारा सुनेत्रा पवार यांनी दिला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज मुंबईत मोठ्या दिमाखात कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षाचे सर्व नेते, मंत्री, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वेगवेगळ्या बातम्या समोर येत होत्या. राष्ट्रवादीत नाराजीनाट्य, कुरबुरी सुरु असल्याचे वृत्त सातत्याने समोर येत होतं. तसेच आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील शाब्दिक जुगलबंदी देखील बघायला मिळाली. यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपल्या पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांना मोठा इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कामकाज पाहत असताना कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असं सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलं.

    “दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या हयातीत सगळ्यांना, कार्यकर्त्यांना खूप समजून घेतलं, त्यांचे हट्ट पुरवले. प्रेम केलं. यापुढे मी पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईन. कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप यामध्ये असेल तर नक्कीच विचार केला जाईल. दादा ज्याप्रमाणे पक्ष हितासाठी कठोर निर्णय घेत होते, त्याचप्रमाणे यापुढे असे निर्णय घेण्यास, खरंतर माझ्या स्वभावाप्रमाणे जड जाईल. पण नक्कीच न्याय देण्यासाठी दादांच्या पावलावर जाण्याचा प्रयत्न मी सतत करत राहीन”, असा मोठा इशारा सुनेत्रा पवार यांनी दिला.

    कठोर भूमिका घेण्याची वेळ येणार नाही याची खबरदारी घेण्याचं आवाहन

    “पक्षात आणि सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रत्येक पदाधिकारी आणि नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी अधिक जागरुक पद्धतीने काम करावे अशी माझी अपेक्षा आहे. पक्षाची बदनामी होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यासह सर्वांची आहे. मला याबाबत कठोर भूमिका घेण्याची वेळ येणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी”, असादेखील इशारा सुनेत्रा पवार यांनी दिला.

    सुनेत्रा पवार यांचा पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांना कानमंत्र काय?

    “बारामतीच्या सर्व मतदारांचे, तसेच माझ्या निवडणुकीसाठी काम करणारे राष्ट्रवादीच्या माझे सर्व कुटुंबाचे, कार्यकर्त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्कीच माझ्या कामातून सिद्ध करुन दाखवेन हा विश्वास आपल्या सर्वांना देते. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या आणि राज्यसभेच्या निवडणुकीत बिनविरोध विजयी झालेल्या सर्वच उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करते. मला खात्री आहे की, पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी हे सर्वच पक्ष हितासाठी माझ्या निर्णयाचे समर्थन करतील. जे कार्यक्रम दिले आहेत ते अंमलात आणतील.”

    “आजपर्यंतच्या प्रवासात आपल्या पक्षाने अनेक चढ-उतार पाहिले. सत्ता पाहिली, विरोधी पक्षातही काम केलं. पण कधीही आपल्या विचारांशी तडजोड केली नाही. यापूढेही तशी तडजोड केली जाणार नाही, पक्षाची राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून मी हा शब्द देते. आपली एकजूट, एकनिष्ठा, आपले कष्ट याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भविष्य अधिक उज्ज्वल ठरणार आहे. त्यामुळे आपण सर्वजण नव्या जोमाने, नव्या निर्धाराने, नव्या आत्मविश्वासाने कामाला लागूयात. वादळांना पाहून आम्ही कधी आमची गलबते वळवली नाहीत. संकटांना सामोरे जातांना कधी आम्ही आमची पावले रोखली नाहीत. घड्याळ्यांच्या काटांचा हा प्रवास थांबणार नाही. संघर्षाच्या या रणांगणात राष्ट्रवादी कधीही मागे हटणार नाही.”

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा