लेक बुडत असल्याचं पाहून आई तिला वाचवण्यासाठी तलावात उतरली होती, मात्र दोघींनाही पोहता येत नसल्याने मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मणेराजुरीतील या घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्वप्निल एरंडोलीकर, सांगली: मणेराजुरी ता. तासगाव येथील वज्रचौडे रोडलगत भोसलेनगरच्या बाजूस असलेल्या चिमणखोरा पाझर तलावात बुधवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी घटनेत आई व मुलीचा बुडून मृत्यू झाला. मुलगी पाण्यात बुडत असल्याचे पाहून तिला वाचविण्यासाठी तलावात उतरलेल्या आईलाही पोहता येत नसल्याने दोघींचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मणेराजुरीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सत्वला संतोष जाधव (वय २८) व मंजू संतोष जाधव (वय ७) अशी मृत मायलेकीची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जाधव कुटुंब मूळचे पुसेसावळी (जि. सातारा) येथील असून उपजीविकेसाठी सुमारे महिनाभरापूर्वी मणेराजुरी येथे आले होते. अत्यंत गरीब परिस्थितीत हे कुटुंब परिसरातील बागायतदारांकडे गाढवांच्या साहाय्याने बांधावर माती टाकणे, खतांची वाहतूक करणे अशी मजुरीची कामे करत होते.
नेमकं काय घडलं?
बुधवारी काम आटोपल्यानंतर सत्वला जाधव आपल्या दोन मुलींना घेऊन जवळच असलेल्या चिमणखोरा पाझर तलावावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. तलावात म्हैशाळ योजनेचे पाणी साठले असून सध्या तलाव अर्ध्याहून अधिक भरलेला आहे. धुणे धुत असताना मंजू ही आईपासून काही अंतरावर पाण्यात गेली. अचानक ती खोल पाण्यात जाऊन बुडू लागल्याचे लक्षात येताच आई सत्वला यांनी तिला वाचविण्यासाठी तलावात उडी घेतली. मात्र दोघींनाही पोहता येत नसल्याने त्या पाण्यात बुडाल्या. घटनेच्या वेळी परिसरात कोणीही नसल्याने तत्काळ मदत मिळू शकली नाही.
ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर
काही वेळाने ग्रामस्थांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पाटील दीपक तेली यांनी तातडीने माहिती दिल्यानंतर तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी टीमसह घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या मदतीने दोघींचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह तासगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रसंगावधानामुळे टळला आणखी अनर्थ
मृत सत्वला जाधव यांची मोठी मुलगी तलावाच्या काठावर उभी होती. आई व बहीण बुडताना पाहूनही तिने घाबरून तलावात उडी न मारता प्रसंगावधान राखले. तिने तातडीने आपल्या आजोबांना मोबाईलवर संपर्क करून माहिती दिली. तिच्या या समंजसपणामुळे आणखी एक जीवितहानी टळल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा