• Tue. Jun 9th, 2026

    राज्याच्या धान खरेदी उद्दिष्टात २९.५ लाख क्विंटलची वाढ – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 8, 2026
    राज्याच्या धान खरेदी उद्दिष्टात २९.५ लाख क्विंटलची वाढ – महासंवाद

    मुंबई, दि. ८ : किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम 2025-26 (रब्बी) साठी महाराष्ट्राच्या धान खरेदी उद्दिष्टात केंद्र शासनाने अतिरिक्त 29.5 लाख क्विंटल वाढ मंजूर केली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्याला ही वाढीव मंजुरी मिळाली आहे.

    शेतकरी व लोकप्रतिनिधींकडून धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री यांनी 27 मे 2026 रोजी नवी दिल्ली येथे केंद्र शासनस्तरीय बैठकीत महाराष्ट्रासाठी रब्बी हंगामातील धान खरेदी उद्दिष्ट वाढविण्याची मागणी केली होती.

    या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत केंद्र शासनाने राज्याला अतिरिक्त 29.5  लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट मंजूर केले आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या 59.5 लाख क्विंटल उद्दिष्टासह आता महाराष्ट्राचे एकूण धान खरेदी उद्दिष्ट 89 लाख क्विंटलवर पोहोचले आहे. रब्बी हंगामासाठी मागील काही वर्षांच्या तुलनेत हे सर्वाधिक उद्दिष्ट आहे. अन्न, नागरी पुरवठा मंत्री श्री भुजबळ यांनी केंद्र शासनाचे आभार मानत या निर्णयामुळे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल तसेच त्यांच्या उत्पादनाला हमीभावाने बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला.

    दरम्यान, 8 जून 2026 अखेर राज्यात एकूण 50.07 लाख क्विंटल धान खरेदी पूर्ण झाली आहे. यामध्ये पणन महासंघामार्फत 48.04 लाख क्विंटल तर आदिवासी विकास महामंडळामार्फत 2.03 लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. वाढीव उद्दिष्टानंतरही सुमारे 39.43 लाख क्विंटल धान खरेदीची क्षमता उपलब्ध असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळणार आहे.

    ०००

    वंदना थोरात/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed