• Tue. Jun 9th, 2026

    मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 8, 2026
    मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार – महासंवाद

    मुंबई, दि. ८ : मुंबईकरांना जागतिक दर्जाची आणि अधिक कार्यक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, तसेच प्रशासकीय कार्यपद्धतीचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक सुधारणा सुचविणारा सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. महानगरपालिका रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि स्वच्छतागृहांची स्थिती तातडीने सुधारण्याचे आदेश देत आरोग्य सेवांचा नियमित आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    सह्याद्री अतिथीगृह येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आधुनिकीकरणासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महापौर रितू तावडे, आमदार, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ॲड.शेलार यांनी राज्याच्या आरोग्य विभाग, नगरविकास विभाग आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यातील समन्वय वाढविण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले. जागतिक आणि राष्ट्रीय निकषांनुसार आरोग्य सेवा उभारण्यासाठी आर्थिक तरतुदींपलीकडे जाऊन आधुनिक ‘मेडिटेक’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली.

    महापौर रितू तावडे यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज व्यक्त केली. कोविड काळात कंत्राटी तत्त्वावर सेवा बजावलेल्या मनुष्यबळाला भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी केली. सिद्धार्थ, राजावाडी आणि इतर रुग्णालयांच्या रखडलेल्या पुनर्विकास कामांना गती देण्याबरोबरच नर्सिंग कॉटेज, झिरो प्रिस्क्रिप्शन सेवा, कूपर रुग्णालयात ईएमएस वॉर्ड, केईएममध्ये एआरटी विभाग आणि शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उभारण्याचे निर्देशही त्यांनी महापालिकेला दिले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या धर्तीवर ‘महापौर वैद्यकीय सहायता कक्ष’ स्थापन करून रुग्णांना मदत करण्यासाठी पारदर्शक आणि सुलभ व्यवस्था विकसित करण्याचा प्रस्तावही महापौरांनी मांडला.

    आमदार अमित साटम यांनी मुंबईतील आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यासाठी डायलिसिस केंद्रांची संख्या वाढविणे, ‘मधुमेहमुक्त मुंबई’ अभियान सुरू करणे, मानसिक आरोग्य केंद्रे उभारणे आणि प्रस्तावित कर्करोग उपचार सुविधा वेळेत कार्यान्वित करण्याची मागणी केली. आगामी काळात महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये सुमारे पाच हजार नवीन रुग्णखटा उपलब्ध होणार असल्याने डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांचे नियोजन आतापासूनच करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

    बैठकीत रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे आधुनिकीकरण, मनुष्यबळ बळकटीकरण, रुग्णालयांच्या पुनर्विकासाला गती आणि तंत्रज्ञानाधारित सेवा विस्तार या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. मुंबईकरांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत महानगरपालिका आरोग्य सेवांचा नियमित आढावा घेतला जाईल, असा पुनरुच्चार पालकमंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी केला.

    ००००

    संजय ओरके/विसंअ

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed