• Fri. Jun 5th, 2026

    Crime News: नागपुरातील दर्ग्यात महिलेच्या जबरदस्ती धर्मांतराचा प्रयत्न; नकार देताच विचित्र प्रकार, ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

    Crime News: नागपुरातील दर्ग्यात महिलेच्या जबरदस्ती धर्मांतराचा प्रयत्न; नकार देताच विचित्र प्रकार, ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

    नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील जुनी कामठी परिसरातील मरियम अम्मा दर्ग्यात एका हिंदू महिलेचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी कोलकाता येथील पीडित महिलेच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी दर्ग्याशी संबंधित सहा जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागपूर ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील कोलकात्याच्या डमडम परिसरात राहणारी ही महिला एप्रिल महिन्यात मरियम अम्मा दर्ग्यात आयोजित करण्यात आलेल्या उर्स कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपूरला आली होती. मागील तीन ते चार वर्षांपासून ती नियमितपणे उर्सच्या कार्यक्रमासाठी येथे येत असल्याचे सांगितले जाते. मात्र यंदाच्या भेटीदरम्यान दर्ग्यातील काही व्यक्तींनी तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप तिने आपल्या तक्रारीत केला आहे.

    महिलेच्या म्हणण्यानुसार, 18 ते 19 एप्रिल दरम्यान तिला दर्गा परिसरात डांबून ठेवण्यात आले. धर्मांतरास नकार दिल्यानंतर तिच्याशी गैरवर्तन करण्यात आले, मारहाण करण्यात आली तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याशिवाय तिच्या हत्येचाही प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. कशीतरी स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर ती कोलकाता येथे परतली. तेथे वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर तिने स्थानिक पोलिस ठाण्यात झीरो तक्रार दाखल केली. घटना नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे डमडम पोलिसांनी झिरो एफआयआरद्वारे प्रकरण कन्हान पोलिसांकडे वर्ग केले. त्यानंतर नागपूर ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

    या प्रकरणात ताजी तनविरुद्दीन कलीमउद्दीन (52), ताजी मुस्ताफिजुद्दीन तनविरुद्दीन (24) आणि तेजस आनंद खोब्रागडे (24) यांना 29 मे रोजी अटक करण्यात आली आहे. उर्वरित तीन आरोपींपैकी दोन महिला आणि एक वयोवृद्ध व्यक्ती असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्यांचा शोध सुरू आहे.

    नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीनुसार मारहाण, धर्मांतरासाठी दबाव आणि हत्येच्या प्रयत्नाचे आरोप नोंदविण्यात आले आहेत. प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने एसआयटीमार्फत तांत्रिक आणि अन्य सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. काही इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त करण्यात आली असून या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच अशा प्रकारचा दबाव किंवा अत्याचार झाल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed