• Fri. Jun 5th, 2026
    आई, बाबा मला माफ करा, NEET परीक्षा पुन्हा देण्याचं धाडस नाही, नागपुरात विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं

    Nagpur NEET aspirant Death Case : आई-बाबा मला माफ करा. पहिल्या नीटचा पेपर चांगला गेला, परंतु आता दुसऱ्यांदा परीक्षा देण्यासाठी माझे धाडस होत नाही, मी तुमचे खूप पैसे वाया घालवले. यासाठी मला माफ करा,’ असे आकांक्षाने चिठ्ठीत लिहिले होते

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : नीट पेपरफुटीमुळे आकांक्षा चतुर्वेदी हिने जीव दिल्याचे उघडकीस आले आहे. ‘पुन्हा परीक्षा देण्याची धाडस होत नसल्याने आत्महत्या करीत आहे’ असे नमूद असलेली तिची चिठ्ठी समोर आली आहे. २० मे रोजी आकांक्षाने अंबाझरी परिसरातील अजयनगर येथील घरी ओढणीने गळफास लावत आयुष्याची अखेर केली होती. पेपरफुटीची ती बळी ठरल्याची चर्चा देशभर होत आहे.

    दुसऱ्यांदा परीक्षा देण्याचे धाडस नाही

    आकांक्षा ऊर्फ स्नेहा कृष्णकुमार चतुर्वेदी ऊर्फ चौबे (वय १८) हिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असताना तिने लिहिलेली चिठ्ठी आढळली. ‘मी टोकाचे पाऊल उचलत आहे. आई, बाबा मला माफ करा. पहिल्या नीटचा पेपर चांगला गेला. मला चांगले गुण मिळण्याची खात्री होती. परंतु, आता दुसऱ्यांदा परीक्षा देण्यासाठी माझे धाडस होत नाही. मी खूप पैसे वाया घालवले. तुमच्यावर दबाव टाकला, मला माफ करा,’ असे आकांक्षाने चिठ्ठीत लिहिले आहे.
    Maharashtra TimesDelhi Fire : आगीत प्राण गेले, पण शेवटची मिठी सुटली नाही; वॉशरुममध्ये एकमेकांना कवेत घेतलेल्या अवस्थेतच जोडप्याचा अंत, काळीज पिळवटणारं दृश्य

    खोलीत जाऊन आयुष्य संपवलं

    देशभरात ३ मे रोजी ‘नीट’ परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या परीक्षेचे पेपर फुटल्याचे उघडकीस आल्यानंतर केंद्रीय शिक्षण खात्याने संपूर्ण परीक्षा रद्द केली. २१ जून पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. हा धक्का आकांक्षाला सहन झाला नाही. २० मे रोजी दुपारी आई नीलमने आकांक्षाला जेवणाबाबत विचारणा केली. ‘नंतर जेवते,’ असे म्हणत ती खोलीत गेली. यादरम्यान तिने ओढणीने गळफास घेऊन आयुष्याची अखेर केली.

    दुपारी तीन वाजताच्या सुमारास नीलम यांनी आकांक्षाला आवाज दिला असता तिने प्रतिसाद दिला नाही. तिचा लहान भाऊ राज याने खिडकीतून बघितले असता आकांक्षाने गळफास घेतलेला दिसला. आकांक्षाला रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरू केला.

    Ahilyanagar | जिल्हाधिकारी कार्यालयात राडा, भाजप कार्यकर्ते वि. अपक्ष उमेदवार आमने-सामने

    वडिलांनी काढले कर्ज

    आकांक्षाचे वडील कृष्णकुमार यांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. आकांक्षा हुशार असल्याने तिची डॉक्टर बनण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी कृष्णकुमार चौबे यांनी सुमारे पंधरा लाख रुपयांचे कर्ज घेतले. यासह त्यांनी किसान क्रेडिट कार्डद्वारेही तीन लाखांची कर्ज घेतले. मुलीच्या शिक्षणासाठी मध्य प्रदेशातील मूळ गावची शेती व घरही गहाण ठेवल्याची माहिती आहे. आकांक्षाने टोकाचे पाऊल उचलल्याने या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंब अद्यापही या धक्कातून सावरलेले नाही.
    Maharashtra TimesBuldhana Crime : बाप-भावाला तुरुंगात टाकलं, पण शिवानी जिवंत निघाली, आता ‘तिची’ ओळख पटवण्यासाठी पोलिसांची आयडिया, नवं पत्रक जारी
    आकांक्षाच्या मृत्यूवरुन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर टीका केली आहे. ‘नागपूरची विद्यार्थिनी आकांक्षा हिने जीव दिला नसून मोदी यांच्या भ्रष्ट, मोडकळीस आलेल्या व्यवस्थेचा तो परिणाम आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान अजूनही पदावर आहेत. तीच समिती. तीच बदली. तोच तपास. सुधारणा नाही, न्याय नाही,’ असे राहुल यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘नीट परीक्षेत मला ६५०पेक्षा अधिक गुण मिळतील,’ असे तिने कुटुंबीयांना सांगितले होते. पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द झाल्यापासून आकांक्षा तणावात होती.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा