म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : विधान परिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकरण मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, सोमवारी भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांमध्ये गोंधळ, नाराजी आणि धुसफूस असल्याचे चित्र दिसले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्याच्या उमदेवारीवरून संभ्रम असून, कोकणची जागा तटकरे यांच्याकडे गेल्याने पक्षात नाराजी आहे. काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली आहे. तर, शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी ‘मोठा भाऊ आम्हाला संपवत आहे’, असा थेट आरोप भाजपवर केल्याने महायुतीतील बेदिली उघड झाली. यवतमाळमध्ये शिवसेनेने दोन उमेदवार दिल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत दोन्ही आघाड्यांकडून उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. अनेकांनी उमेदवारीसाठी आपली दावेदारी दाखल केली होती. त्यामुळे पक्षनेतृत्वाने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर अनेक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. तसेच काहींनी बंडाचे निशाण फडकावले.
पुण्यात राष्ट्रवादीचे दोन उमेदवार
महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. यापैकी पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून उद्योजक संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम यांनी तसेच माजी आमदार सुनील टिंगरे यांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण, यावर राष्ट्रवादीमध्येच गोंधळ उडाल्याचे दिसून आले. अहिल्यानगर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात भाजपच्या प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या (शप) राणी लंके, काँग्रेसच्या करण ससाणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मच्छिंद्र धुमाळ यांनी अर्ज भरले आहेत.
यवतमाळमध्ये शिवसेनेत दुफळी
यवतमाळ मतदारसंघात शिवसेनेत उमेदवारीवरून गोंधळ आहे. तिथे दुष्यंत चतुर्वेदी आणि मंत्री संजय राठोड यांच्या पत्नी शीतल राठोड अशा दोघांनी अर्ज भरले आहेत. तर, छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात भाजपच्या सुहास शिरसाट यांच्याविरोधात शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. रायगडमध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिकेत तटकरे यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे.
काँग्रेसमध्ये गोंधळ
प्रदेश काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार नांदेड मतदारसंघातून रामदास पाटील -सुखटणकर हे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. त्याचवेळी माजी आमदार माधवराव पाटील -जळगावकर यांचा यादीत अपक्ष म्हणून उल्लेख आहे. नांदेडमध्ये भाजपकडून अमर राजूरकर यांनी अर्ज भरला असून येथे अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील -चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण आणि हिंगोलीचे शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार नागेश पाटील-अष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा यांनी बंडखोरी केली आहे. दरम्यान, काँग्रेसने वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीमधून शैलेश अग्रवाल,भंडारा-गोंदियातून माजी आमदार दिलीप बनसोड यांना उमेदवारी दिली
दरम्यान, काँग्रेसने वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीमधून शैलेश अग्रवाल, भंडारा-गोंदियातून माजी आमदार दिलीप बनसोड यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय अपक्ष उमेदवार म्हणून प्रफुल्ल अग्रवाल, नरेश ईश्वरकर यांचा यादीत उल्लेख आहे. यवतमाळमध्ये साहेबराव दत्तराव कांबळे, अमरावती येथून हर्षदीप देशमुख, नागपूर पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून अतुल लोंढे आणि दिनेश ढोले असे दोघांनी अर्ज भरले आहेत. धाराशिव-लातूर-बीडमधून महेश देशमुख, सोलापूरमधून आदित्य फत्तेपूरकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे.
पक्षनिहाय उमेदवार
महायुती : भाजप : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : अरुण लखानी, भंडारा-गोंदिया : अविनाश ब्राह्मणकर, अमरावती : प्रवीण पोटे-पाटील, सांगली-सातारा : धैर्यशील कदम, सोलापूर : राजेंद्र राऊत, अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट, नांदेड : अमर राजूरकर, धाराशिव-लातूर-बीड : बसवराज पाटील, जळगाव : नंदकिशोर महाजन, नागपूर पोटनिवडणूक : डॉ. राजीव पोतदार. शिवसेना : ठाणे : रवींद्र फाटक, नाशिक : नरेंद्र दराडे, यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी किंवा शीतल राठोड, परभणी-हिंगोली : सईद खान. राष्ट्रवादी काँग्रेस : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे, पुणे : विक्रम काकडे किंवा सुनील टिंगरे.
महाविकास आघाडी : शिवसेना (उबाठा) : नाशिक : अनिल कदम, परभणी : डॉ. विवेक नावंदर, छत्रपती संभाजीनगर-जालना : देवयानी डोणगावकर, जळगाव : शरद तायडे, रायगड-रत्नागिरी : बाळ माने. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) : पुणे : श्रीकांत पाटील, ठाणे : अभिजित पवार, सांगली-सातारा : बाळासाहेब ऊर्फ बापू पाटील.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा