• Fri. Jun 5th, 2026

    Pune Crime: सोलापुरातून पुण्यात आला, योगेशचा झाला ‘सिकंदर’; २२ जणांचा जीव घेणाऱ्या तरुणाबद्दल धक्कादायक माहिती

    Pune Crime: सोलापुरातून पुण्यात आला, योगेशचा झाला ‘सिकंदर’; २२ जणांचा जीव घेणाऱ्या तरुणाबद्दल धक्कादायक माहिती

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: विषारी दारूकांड प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश व्हानकडे याने खरी ओळख लपविण्यासाठी चक्क ‘सिकंदर राठोड’ हे काल्पनिक नाव धारण केल्याचे तपासात उघड झाले आहे. मागील तीन वर्षांपासून बेकायदा दारूविक्रीचा काळा धंदा करताना पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तो खोट्या नावाने वावरत होता.

    ‘मिथेनॉल’मिश्रित गावठी दारूच्या सेवनाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वीसहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी योगेश रामचंद्र व्हानकडे (वय २३, रा. केशवनगर, मुंढवा), कर्नेलसिंग तखतसिंग विरका (वय ७३), गुरमंतसिंग कर्नेलसिंग विरका (वय ४५, दोघे रा. संजयनगर, फुगेवाडी), राधेश्याम हरिराम प्रजापती (वय ३५, रा. उरुळी कांचन) यांना पुणे न्यायालयाने १० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात दापोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार योगेश राजेंद्र व्हानकडे (वय २३) हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील बेलाटी लमाण तांडा येथील रहिवासी आहे. रोजगाराच्या निमित्ताने तो काही वर्षांपूर्वी पुण्यात आला. सुरुवातीला कुंजीरवाडी आणि घोरपडी भागांत राहिल्यानंतर, गेल्या पाच महिन्यांपासून तो केशवनगर परिसरातील गुरुकृपा सोसायटीत आई-वडिलांसह राहत होता. स्वतःला सर्वसामान्य नागरिक भासविणारा योगेश प्रत्यक्षात तीन वर्षांपासून दारूविक्री व्यवसायात सक्रिय असल्याचे तपासात उघड झाले आहे.

    उरुळी कांचन परिसरातील राजू प्रजापती उर्फ राधेश्याम गोयल हा या साखळीतील त्याचा मुख्य पुरवठादार होता. योगेश हा प्रजापतीकडून ३५ लिटर क्षमतेचा एक हातभट्टीचा कॅन १७०० ते १८०० रुपयांना विकत घ्यायचा. त्यानंतर ही दारू पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विविध भागांतील बेकायदा मद्य विक्रेत्यांना पुरवित होता. योगेश याच्याविरोधात मुंढवा आणि हडपसर पोलिस ठाणे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेकायदा दारूची वाहतूक, साठा आणि विक्री प्रकरणात त्याच्यावर यापूर्वी कारवाया झाल्या.

    दोन दिवसांत मृत्यूचे कारण स्पष्ट?

    पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात अल्पावधीत झालेल्या मृत्यूंचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतांच्या अंतर्गत अवयवांचे (व्हिसेरा) नमुने प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. सार्वजनिक हिताचा विषय लक्षात घेऊन या नमुन्यांची तातडीने तपासणी केली जाणार असून, पुढील दोन ते तीन दिवसांत अहवाल प्राप्त होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांच्या लक्षणांवरून ‘मिथेनॉल’ची विषबाधा हे मुख्य कारण असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांसह न्यायवैद्यक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ‘मिथेनॉल’मुळे मृत्यू होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण आणि कोणत्या रसायनांमुळे मृत्यू झाला, हे ‘व्हिसेरा’ तपासणीतूनच स्पष्ट होणार असल्याचे प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. मृतांच्या शवविच्छेदनादरम्यान पोट, आतडे, यकृत, किडनी, प्लीहा यांचे नमुने; तसेच रक्त जतन करून ते तपासणीसाठी पाठविण्यात येतात. अंतर्गत अवयवांबरोबरच २० सीसी रक्त व्हिसेरा घेण्यात येतो. २० सीसी व्हिसेरामध्ये शवविच्छेदनावेळी मृताच्या शरीरातून घेतलेले २० मिलिलिटर रक्ताचे नमुने घेतले जातात. यामुळे विषबाधा, मद्य, औषधे, रसायने किंवा इतर विषारी पदार्थांमुळे मृत्यू झाला का, याची तपासणी करण्यात येते.

    तपासणीचा वेग वाढविणार

    साधारणतः एक व्हिसेरा तपासण्यासाठी आणि अहवाल तयार करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, या प्रकरणात कमी वेळेत तपासणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. काही नमुने प्रयोगशाळेत दाखल झाले असून, उर्वरित नमुनेही लवकरच पोहोचणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed