Pune Liquor Case: हडपसर परिसरातील अवैध दारूविक्री आणि हातभट्ट्यांविरोधात शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी आंदोलन करण्यात आले. विषारी दारूमुळे नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतरही परिसरात गावठी दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप करून शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
विषारी दारूमुळे नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित यंत्रणा अधिक दक्ष होतील आणि अवैध दारू व्यवसायावर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, मृत्यूची घटना घडून अवघे काही तास उलटत नाहीत तोच हडपसर परिसरात हातभट्ट्या सुरू असल्याचे आणि तेथे मोठ्या प्रमाणात बनावट गावठी दारूचा साठा असल्याचे समोर आले. कृष्णानगर परिसरातील तरवडे वस्ती पोलिस चौकीच्या मागील भागात; तसेच साठे वस्ती परिसरात गावठी दारू तयार केली जात असल्याचे आढळून आले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूचे उत्पादन सुरू असल्याचे आणि विक्रीसाठी साठा तयार ठेवण्यात आल्याचेही निदर्शनास आले.
Tukaram Mundhe: विषारी दारुमुळे पुण्यात मृत्यूंची मालिका; तुकाराम मुंढेंनी भेसळीची पाळेमुळे खणून काढली, भिवंडीत मोठी कारवाई!
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या भागात अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री आणि हातभट्ट्यांचा व्यवसाय सुरू आहे. विषारी दारूमुळे नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतरही या धंद्यांवर प्रभावी कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, ज्या भागात विषारी दारूमुळे नागरिकांचे जीव गेले, त्याच जवळपास भागात दुसऱ्याच दिवशी गावठी दारूचे उत्पादन आणि विक्री सुरू असल्याचे चित्र समोर आल्याने संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अवैध दारूचा हा व्यवसाय नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ करणारा असल्याने त्यामागील साखळी उघड करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
लोणावळ्यात 450 फूट खोल दरीत पडून नौदल कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; व्हिडिओ कॉलवर बोलणं महागात, काय घडलं?
दरम्यान, हडपसर परिसरातील अवैध दारू व्यवसाय, हातभट्ट्या आणि त्यामागील आर्थिक हितसंबंध यांची सखोल चौकशी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. विषारी दारूकांडानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नसल्याचे समोर आल्याने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
‘सर्वसामान्य नागरिकांना अवैध दारूचे अड्डे दिसतात, मग पोलिसांना ते का दिसत नाहीत. शहरातील अनेक भागांत वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी केली.
