• Sat. Jun 6th, 2026
    Mumbai Goa Highway Accident: गावी सुट्टी संपवून दापोलीला निघाले, पण वाटेत कंटेनरला कारची धडक; पत्नी-मुलीचा मृत्यू, डॉ. अनिल मरकड गंभीर

    Accident News: रायगडमधील पोलादपूरजवळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक बसल्याने आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. डॉ. अनिल मरकड गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून शनिवारी दुपारी पोलादपूरजवळ झालेल्या भीषण अपघातात आई-मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालक वडिल गंभीर जखमी झाले आहेत. उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. अनिल मरकड हे आपल्या कुटुंबासह एमएच-08 एएन-2439 क्रमांकाच्या कारमधून नगर जिल्ह्यातील गावी सुट्टी घालवून दापोलीकडे परतत होते. पोलादपूर हद्दीतील हॉटेल बालाजी परिसरात आल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच-04 एलवाय-1638 क्रमांकाच्या कंटेनरला त्यांच्या कारची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

    पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू

    या अपघातात सुवर्णा मरकड आणि अनुक्षी अनिल मरकड यांचा जागीच मृत्यू झाला. सुवर्णा मरकड या दापोली येथील स्टेट बँकेत वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होत्या. या दुर्घटनेमुळे मरकड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    डॉ. अनिल मरकड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर माणगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर चिन्मय मरकड याला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी महाड येथे दाखल करण्यात आले आहे.

    Maharashtra TimesOBCसाठी आम्ही ढेकळात बसू! Manoj Jarange यांच्या उपोषणानंतर Laxman Hake यांचा प्रतिआंदोलनाचा इशारा, मराठा-ओबीसी संघर्ष वाढण्याची चिन्हे

    जेसीबीच्या सहाय्याने जखमींना बाहेर काढले

    अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस आणि स्थानिक यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. कारचे मोठे नुकसान झाल्याने वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. त्यानंतर सर्वांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर गंभीर जखमी डॉ. अनिल मरकड यांना पुढील उपचारांसाठी माणगाव येथे हलविण्यात आले.

    महामार्गावरील अपघातांबाबत चिंता

    या अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलादपूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा