Pune RTO News: केंद्र सरकारने पूर्वीच जुन्या वाहन खरेदी-विक्री करणाऱ्यांना परवाना देण्याचे धोरण आखले होते; पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नव्हती. त्यामुळे हा नवीन आदेश काढला आहे.
pune news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे: नोंदणीकृत (जुन्या) वाहनांच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आता अधिकृत मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने हा आदेश जारी केला असून, विनापरवाना हा व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. जुन्या वाहनांची खरेदी-विक्री किंवा एक्स्चेंजचा व्यवसाय करणाऱ्या सर्व व्यक्ती व आस्थापनांना ‘नोंदणीकृत वाहन विक्रेत्याचे अधिकृतता पत्र’ (नमुना २९सी) प्रमाणपत्र घेणे आवश्यक राहील. ही मान्यता नसताना कोणालाही हा व्यवसाय करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पुण्यात जुन्या वाहन खरेदी-विक्रीचे मोठे मार्केट आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत जुनी वाहने खरेदी-विक्री करणारे छोटे-मोठे विक्रेते आहेत. त्यांच्याकडून दुचाकी व चारचाकी मोठ्या प्रमाणात खरेदी व विक्री केली जाते; पण बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीने वाहन विक्री सेंटरला दिल्यानंतर ते पुढे दुसऱ्या व्यक्तीला विकले जाते. ते नंतर खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर केले जात नाही. कधी-कधी वाहनमालकाने विक्रीसाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिलेले असते; पण ते वाहन खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर केलेले नसते. वाहन विक्री झालेले असते आणि ते वाहन दुसरीच व्यक्ती चालवत असते. त्यामुळे मूळ मालकाच्या मनात कायम भीती राहते; तसेच जुन्या वाहन खरेदी-विक्रीमध्ये फसवणुकीचे प्रकारही घडतात.
फसवणूक टाळण्यास मदत होणार
‘जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्यांनी पुणे आरटीओकडे ‘२९ए’नुसार अर्ज केल्यानंतर ‘आरटीओ’कडून ‘२९बी’नुसार अधिकृत विक्रीचे प्रमाणपत्र दिले जाईल. त्यामुळे या वाहन विक्रेत्यांनी मालकाकडून वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाची मालकी स्वतःच्या सेंटरच्या नावे करता येणार आहे. त्यामुळे पुढे ते विक्री केल्यानंतर ते वाहन दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करून देणे सोपे जाणार आहे; तसेच चोरीची वाहने व फसवणूक टाळण्यास मदत होणार आहे. याचा फायदा जुने वाहन खरेदी-विक्री करणाऱ्यांना होणार आहे,’ अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली.
‘प्रमाणपत्र त्वरित घ्या’
पुणे ‘आरटीओ’च्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहन विक्रेत्यांना त्वरित अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अर्ज प्राप्त झाल्यानंतर मोटार वाहन निरीक्षकांकडून संबंधित आस्थापनाची तपासणी केली जाईल. अधिसूचनेतील निकष पूर्ण करणाऱ्या पात्र विक्रेत्यांनाच ‘नमुना २९सी’ प्रमाणपत्र दिले जाईल. पूर्वी अनेक ठिकाणी अनधिकृत दलालांमार्फत वाहन खरेदी-विक्री व्यवहार होत असल्याच्या तक्रारी होत्या. कागदपत्रांची अपूर्णता, मालकी हक्कातील वाद आणि फसवणुकीच्या घटना वाढत असल्यामुळे सरकारने ही प्रक्रिया कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमामुळे व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परवानगी न घेता जुनी वाहने विक्री किंवा एक्स्चेंजचा व्यवसाय करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल. त्यामुळे सर्व संबंधितांनी अधिकृत प्रमाणपत्र तत्काळ प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन ‘आरटीओ’ने केले आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा