• Mon. Jun 15th, 2026

    PM Surya Ghar Yojana : तुम्हाला मोफत वीज हवी का? केंद्र सरकरची महत्त्वकांक्षी योजना, कसा करावा अर्ज? वाचा सविस्तर

    PM Surya Ghar Yojana : तुम्हाला मोफत वीज हवी का? केंद्र सरकरची महत्त्वकांक्षी योजना, कसा करावा अर्ज? वाचा सविस्तर

    PM Surya Ghar Yojana Details : केंद्र सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांवा विजेच्या बिलापासून दिलासा मिळावा यासाठी अत्यंत महत्त्वकांक्षी अशी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून नागरिकांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळत आहे. याशिवाय बराच फायदा मिळत आहे. तुम्ही सुद्धा या योजनेचा फायदा घेऊ शकता.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्यासह देशात सूर्य आग ओकतोय. तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे घराघरात पंखे, कुलर, एसीचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यामुळे विजेचा मोठा वापर होत आहे. परिणामी विजेचं बिल जास्त येत आहे. यामुळे नागरित चिंतेत आहेत. पण विजेच्या बिलापासून दिलासा हवा असेल तर केंद्र सरकारची एक खूप चांगली योजना आहे. या योजनेचं नाव पीएम सूर्यघर मोफत वीज योजना असं आहे. या योजनेतून नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना 300 यूनिटपर्यंत फ्री वीज मिळत आहे. या योजनेसाठी नागरिकांना सब्सिडीदेखील मिळते.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही अत्यंत महत्त्वकांक्षी योजना आहे. ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भर व्हावा यासाठी हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. या योजनेचा उद्देश हा एक कोटी घरांपर्यंत रुफटॉप सोलर पोहोचावणे, वीज बिल कमी करणं आणि देशांतर्गत हरित ऊर्जा उत्पादन वाढवणं असा आहे.

    विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार नागररिकांना आपल्या घरांच्या छतावर सोनार पॅनल बसवण्यासाठी आर्थिक सहाय्य देखील करतं. या सोलार पॅनलच्या माध्यमातून नागरिक आपल्या घरासाठी लागणारी वीज स्वत: तयार करु शकणार आहेत. तसेच अतिरिक्त वीज ग्रिडला पाठवून आर्थिक लाभ देखील मिळवू शकतात.

    या योजनेच्या माध्यमातून लाखो कुटुंबांचा वीजेचा खर्च हा शुन्यावर येईल, असा केंद्र सरकारचा दावा आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी नागरिक मार्च 2027 पर्यंत अर्ज दाखल करु शकतात. त्यामुळे ज्या नागरिकांना विजेचं बिल जास्त द्यावं लागतं, ते कुटुंब या योजनेसाठी अर्ज दाखल करु शकतात. ही योजना दिर्घकाळासाठी फायदेशीर आहे.

    पीएम सूर्य घर योजनेच्या माध्यमातून सोलार सिस्टीम लावण्यासाठी सरकार सब्सिडी देतं. सोलार प्लांट बनवण्यासाठी 80 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. यासाठी सरकारकडून कर्जाच्या माध्यमातून देखील पर्याय उपलब्ध आहेत. माहितीनुसार, 7 टक्के व्याजदराने 2 लाख रुपयांचे कर्ज या कामासाठी नागरिकांना मिळू शकते. विशेष म्हणजे केंद्र सरकार या खर्चाच्या 40 ते 60 टक्के पैसे सब्सिडीच्या रुपाने परत देतं.

    नेमकी किती सब्सिडी मिळते?

    केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या kW च्या सिस्टीमवर वेगवेगळ्या प्रकारची सब्सिडी दिली जाते. 1kW च्या सिस्टीमवर सरकारकडून 30 हजार रुपयांची सब्सिडी दिली जाते. 2kW च्या सिस्टीमवर सरकारकडून 60 हजार रुपयांची सब्सिडी दिली जाते. तर 3kW च्या सिस्टीमवर सरकारकडून 78 हजार रुपयांपर्यंत सब्सिडी दिली जाते. असं असलं तरी काही राज्यांमध्ये त्या त्या राज्य सरकारकडून अतिरिक्त सब्सिडी दिली जात असल्याची देखील माहिती आहे.

    कसा मिळणार लाभ आणि अर्ज कसा करायचा?

    ज्या नागरिकांचं स्वत:चे पक्क घर आहे, स्लॅबचे पक्के छत आहे आणि त्या व्यक्तीच्या नावावर विजेचं कनेक्शन आहे, अशा व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर सर्वात आधी www.pmsuryaghar.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. इथे गेल्यानंतर आपल्या राज्याची विज कंपनी जसे की, MSEDCL असे टाका, आपले नाव आणि कंज्यूमर नंबर टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करा.

    यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबरने लॉगिन करा आणि ‘रुटटॉप सोलर’साठी ऑनलाइन अर्ज करा. वीज कंपनीकडून मंजुरी मिळाल्यानंतर पोर्टलवर उपलब्ध वेंडरला निवडा आणि आपल्या घराच्या छतावर पॅनल लावून घ्या. इन्स्टॉलेशन नंतर वेंडरकडून मिळालेल्या माहिती आणि प्लांटचा फोटो पोर्टलवर अपलोड करा आणि ‘नेट मीटर’साठी अर्ज करा. डिस्कॉमचे अधिकारी प्लांटचे फिजिकल वेरीफिकेशन करतील. या प्रक्रियेनंतर 30 दिवसांत सस्बिडीची पूर्ण रक्कम बँक खात्यात जमा होते.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा