• Sun. Jun 7th, 2026
    Nashik Crime: गुप्तधनासाठी बळकावली जमीन; पीडितांना डांबून ठेवले, भोंदूबाबासह पत्नीवर गुन्हा दाखल

    Nashik Crime: ‘तुमच्या घरात गुप्तधन असून, त्यावर अघोरी शक्तींचा पहारा आहे’, असे सांगून त्यांना जाळ्यात ओढले.

    नाशिक भोंदूबाबा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: शेतातील गुप्तधन काढून देणे, घरातील दोष आणि पितृशाप दूर करण्याचे आमिष दाखवून एका २५ वर्षीय तरुणाची दोन एकर शेती आणि दीड लाख रुपये हडप केल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघड झाला आहे. या प्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलिस ठाण्यात भोंदूबाबा संशयित कमलेश उर्फ शिवकुमार अधिकारी आणि त्याची पत्नी गौरी कमलेश अधिकारी (रा. पाथर्डी फाटा) यांच्याविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सोलापूर येथील माढा तालुक्यातील लऊळ गावातील रहिवासी मदन नवनाथ देवकर (वय २६) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. देवकर आणि त्यांच्या भावाची सप्टेंबर २०२३ मध्ये नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये संशयित कमलेश अधिकारी आणि त्याच्या पत्नीशी ओळख झाली होती. देवकर यांच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. त्याचाच गैरफायदा घेत संशयितांनी ‘तुमच्या आई-वडिलांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून त्यांच्यावर करणी करण्यात आली आहे’, अशी भीती दोन भावांच्या मनात भरवली.

    Maharashtra TimesNashik News : धरणात उतरणं पडलं महागात, पाण्याचा अंदाज न आल्यानं पती-पत्नीसह शेजारील दोन लेकरं बुडाली; आई-वडिलांचा मृत्यू चिमुकलीनं डोळ्यांनी पाहिला
    घरावरील शाप दूर करण्यासाठी आणि गुप्तधन बाहेर काढण्यासाठी संशयितांनी उज्जैन, पिंपरखेड, पेगलवाडी फाटा या ठिकाणी नेऊन कोंबड्या-बकऱ्यांचा बळी देत अघोरी पूजा केली. या पूजेच्या आणि विधींच्या खर्चाच्या नावाखाली संशयितांनी फिर्यादीकडून दीड लाख रुपये उकळल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

    धाक दाखवून केले बक्षीसपत्र
    संशयितांनी भावांवर तांत्रिक-मांत्रिक विधींच्या सहाय्याने मानसिक दबाव आणला. अंधश्रद्धेच्या भयाखाली ठेवून संशयितांनी त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे काढून घेतली. यानंतर त्यांना धमकावून आणि खोटे आश्वासन देऊन रजिस्ट्रार कार्यालयात नेले. तिथे मदन देवकर यांची मौजे लऊळ येथील अठरा लाख रुपये किमतीची २ एकर वडिलोपार्जित शेती ‘महादेवी ज्ञानविद्या ट्रस्ट’ या संस्थेच्या नावावर बक्षीसपत्र केले.

    धमकी देऊन मानसिक छळ
    जमीन नावावर करून घेतल्यानंतर गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून संशयितांनी दोन्ही भावांना त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकराज आश्रमात तसेच इतर विविध मठांमध्ये जबरदस्तीने ठेवले. त्यांच्या हालचालींवर पूर्णपणे नियंत्रण ठेवून त्यांचा बाहेरील जगाशी आणि नातेवाइकांशी असलेला संपर्क तोडला. त्यांना तिथून बाहेर पडू दिले नाही. ‘जर पोलिसांत गेलात किंवा कोणाला सांगितले तर गंभीर परिणाम होतील’, अशी धमकी देऊन त्यांना मानसिक त्रास दिल्याचेही फिर्यादीत आहे.

    Maharashtra TimesNida Khan : ‘हानिया जो कन्व्हर्ट हुई…’; निदा खानने नातेवाईकाला मराठी तरुणीबद्दल काय सांगितलं? महत्त्वाचे चॅटिंग पोलिसांच्या हाती
    ‘ अंनिस ‘चा पाठपुरावा
    या दोन्ही तरुणांनी नाशिक येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांशी संपर्क केला. त्यानुसार पीडितांसोबत ‘अंनिस’चे डॉ. ठकसेन गोराणे, कृष्णा चांदगुडे व इतर पदाधिकारी इंदिरानगर पोलिसांत पोहोचले. त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी पडताळणी केल्यानंतर तातडीने संशयित भोंदू बाबाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा