Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटातील भीषण अपघात झाला. यामध्ये मृत्यू झालेल्या ८ तरुणांच्या कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. या सर्व कुटुंबीयांची खासदार उदयनराजे भोसले यांनी आसगावमध्ये भेट घेतली, त्याचे सांत्वन केले. उदयनराजेही यावेळी भावुक झालेले पाहायला मिळाले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा: आंबेनळी घाटातील भीषण अपघातानंतर आसगाव गावावर शोककळा पसरली असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी मृत तरुणांच्या कुटुंबीयांची भेट घेत धीर दिला. एकाच गावातील आठ मित्रांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण सातारा हादरला असून, सांत्वन करताना उदयनराजेंनाही गहिवरून आलं. ‘मी तुमच्या मुलाची जागा घेऊ शकत नाही, पण मुलगा आणि भाऊ म्हणून कायम पाठीशी उभा राहीन,’ अशा शब्दांत त्यांनी कुटुंबीयांना आधार दिला.
घाटात गाडी कोसळली, 8 जण दगावले
आंबेनळी घाटातील भीषण अपघातात स्कॉर्पिओ गाडी 1200 फूट खोल दरीत कोसळून 8 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक दुर्घटनेने सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. सोमवारी मध्यरात्री चौघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आज खासदार उदयनराजे भोसले यांनी आसगावमध्ये जाऊन मृत तरूणांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. ज्यावेळी राजे याठिकाणी पोहोचले तेव्हा मृतांच्या नातेवाईकांना भरून आलं, त्यांनी राजेंना पाहून हंबरडा फोडला, तर लहान मूलं हमसून हमसून रडली. हे चित्र पाहून संपूर्ण परिसर स्तब्ध झाला होता.
मृतांची नावे
आसगाव येथील महेश पवार, आदित्य साळुंखे, रितेश लोखंडे, सुहास लोखंडे, अंश चव्हाण, मर्ढे येथील उत्कर्ष शिंगटे, प्रवीण शिंगटे आणि खटाव येथील संदीप काटकर हे आठ मित्र कोकणात हर्णे येथे फिरायला गेले होते. परत येताना महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात स्कार्पिओ गाडी 1200 फूट खोल दरीत कोसळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण आसगाव सुन्न झालं. शिक्षण आणि करियरसाठी धडपडणाऱ्या मुलांच्या अपघाती मृत्यूने सर्वांनाच जबर धक्का बसला आहे.
साताऱ्यापासून अवघ्या दहा-बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या आसगाववर अपघाताने मोठा आघात झाल्याने खासदार उदयनराजे भोसले आज तातडीने मृत मुलांच्या घरी गेले. कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
त्यावेळी उदयनराजेंना देखील गहिवरून आलं. ‘मी तुमच्या मुलाची किंवा भावाची जागा कधीच भरून काढू शकत नाही, पण मुलगा आणि भाऊ या नात्याने सदैव तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहीन’, असा शब्द त्यांनी दिला.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा