• Sat. Jun 6th, 2026
    डिझेल संपले, ट्रॅक्टर शेतात उभे; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे इंधनटंचाईचे संकट

    Chhatrapati Sambhajinagar Fuel Crisis: शहर परिसरात शेतकऱ्यांच्या डिझेल व पेट्रोलसाठी रांगा लागलेल्या आहेत. डिझेलसाठी रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांना ‘मेलडी’ चॉकलेट देऊन सरकारचा निषेध करण्यात आला.

    इंधन टंचाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    तुषार बोडखे, छत्रपती संभाजीनगर : ‘शेतात नांगरट करायची आहे; पण डिझेल नसल्यामुळे दोन दिवसांपासून ट्रॅक्टर शेतात उभा आहे. परिसरातल्या पंपांवर डिझेल नसल्यामुळे शेतीची कामे कशी उरकायची,’ असा प्रश्न मावसाळा येथील शेतकरी आदित्य श्रीखंडे विचारतो. या तरुण शेतकऱ्यांप्रमाणे हजारो शेतकरी पेट्रोल पंपांवर प्लास्टिकचे कॅन घेऊन रांगेत उभे आहेत. गंभीर इंधन टंचाईमुळे खरीप हंगामाची कामे ठप्प झाली आहेत.

    मावसाळा (ता. खुलताबाद) येथील तरुण शेतकरी आदित्य श्रीखंडे शेताची नांगरणी कशी करावी, या पेचात आहे. दोन दिवसांपासून त्याचे ट्रॅक्टर डिझेल संपल्यामुळे शेतात उभे आहे. साडेतीन एकर शेती असलेला आदित्य खरीप हंगामासाठी नांगरणी करीत आहे. निम्म्या शेताची नांगरणी झालेली असताना शुक्रवारी डिझेल संपले. तेव्हापासून तो डिझेल आणण्यासाठी वेगवेगळ्या पंपांवर हेलपाटे मारत आहे. खुलताबाद, सराई, वेरूळ या भागात कोणत्याही पंपावर डिझेल शिल्लक नाही. दोन दिवसांपूर्वी डिझेलसाठी आदित्य रात्रभर पेट्रोल पंपावर थांबलेला होता. डिझेलची गाडी येणार असल्याचे समजले; पण गाडी आली नसल्याने निराश होऊन घरी परतला. काही शेतकरी पंपावर थांबलेले आहेत.

    Sambhaji Bhide यांची लायकी काढली, मराठा बांधव भिडेंवर तुटून पडले, फडणवीसांवरही आरोप

    ‘तीन वर्षांपूर्वीपर्यंत आमच्याकडे बैलजोडी होती; पण बैलांना सांभाळणे परवडत नाही. शिवाय, शेतीच्या कामांचे यांत्रिकीकरण झाल्यानंतर ट्रॅक्टर घेतला. आंतरमशागत करण्यासाठी बैलजोडी रोजंदारीने बोलावतो. पण, मूळ नांगरणीचे काम बंद पडल्यामुळे डिझेलसाठी पुन्हा-पुन्हा पेट्रोल पंपावर जावे लागत आहे,’ असे आदित्यने सांगितले. सध्या पंपावर प्लास्टिकच्या कॅन घेऊन शेतकरी रांगेत उभे आहेत. डिझेल भरलेले वाहन आले तरी तासाभरात पंप ‘ड्राय’ होतो. इंधन तुटवड्याने खरीप हंगामाची कामे ठप्प झाल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे. जास्तीचे डिझेल घेऊ नये म्हणून काही पंपचालक वाहनात डिझेल देत आहेत; पण ट्रॅक्टर किंवा इतर वाहन शेतात, रस्त्यात बंद पडलेले असेल तर इथपर्यंत कसे आणणार, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

    पुरेसे डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी संघटनेचे जगदीश डवले, चिंचोलीचे माजी सरपंच प्रभू वाघ, कृष्णा वाघ, शिवाजी डवले, श्रीमंत पठाडे, विलास शेळके, विश्वंभर हाके, गणेश हाके, बद्रीनाथ ढाकणे यांनी केली आहे.

    Maharashtra Timesमहाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी, Eknath Shinde अचानक दिल्ली दौऱ्यावर का गेले? संजय शिरसाट यांच्याकडून स्पष्टीकरण
    मशागतीचे गणित बिघडले

    दरवर्षी खरीप हंगामात ट्रॅक्टर नसलेले शेतकरी उधारीवर शेताची नांगरणी करतात. फक्त डिझेलच्या खर्चाचे पैसे देऊन उरलेले पैसे पीक निघाल्यावर देतात. यंदा डिझेल टंचाईमुळे ‘डिझेल आणा आणि नांगरणी करुन घ्या’ अशी अट ट्रॅक्टरचालकांनी घातली आहे. शिवाय, नांगरणीचा दर प्रतितास सहाशे रुपयांवरुन सातशे ते आठशे रुपये केला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. डिझेलची दरवाढ आणि टंचाईमुळे शेतकऱ्यांना वणवण फिरण्याची वेळ आली आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा