• Sat. Jun 6th, 2026
    Shivraj Motegaonkar: डॉक्टरकीसाठी तंत्र-मंत्र पॅटर्न? तांब्याचं भांडं, गवत अन् थेट ‘AIIMS’ची हमी, मोटेगावकरच्या व्हिडिओनं खळबळ

    Shivraj Motegaonkar Viral Video: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर याचा RCC क्लासमधील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘AIIMS ला लागणार’ म्हणत विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडतानाचा व्हिडिओ चर्चेत असून CBI तपासात नवे खुलासे समोर येत आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ऋषिकेश होळीकर, लातूर: देशभरात प्रचंड गाजत असलेल्या नीट परीक्षा घोटाळ्याच्या तपासात रोज नवनवीन आणि थक्क करणारे खुलासे होत आहेत. या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असतानाच, आता या घोटाळ्यातील आरोपी आणि लातूरच्या आरसीसी क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याचा एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मोटेगावकर आपल्या क्लासमधील विद्यार्थ्यांवर चक्क तंत्र-मंत्र किंवा अंधश्रद्धेसारख्या गोष्टींचा आधार घेताना दिसत असल्याने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

    तांब्याचं भांडं, गवत अन् ‘एम्स’चा दावा!

    व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सीबीआयच्या कोठडीत असलेला शिवराज मोटेगावकर क्लासमधील शेकडो विद्यार्थ्यांसमोर उभा असल्याचे दिसते. त्याच्या हातात तांब्याचे एक भांडे असून, तो गवताच्या साहाय्याने त्यातील पाणी वर्गातील विद्यार्थ्यांवर जोरात शिंपडताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे पाणी शिंपडताना ‘तुम्ही सगळे एम्सला (AIIMS) लागणार’ असा मोठा दावा तो विद्यार्थ्यांसमोर करत असल्याचे व्हिडिओत स्पष्ट ऐकू येत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, विद्यार्थ्यांना डॉक्टर बनवण्याचे आमिष दाखवून मोटेगावकर क्लासमध्ये नक्की काय चालवायचा? आणि तो अशा प्रकारे अंधश्रद्धेचा आधार घेत होता का? असा संतप्त सवाल आता नेटकऱ्यांकडून विचारला जात आहे.

    सीबीआयला काय संशय?

    दुसऱ्या बाजूला, सीबीआयने या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणाचा तपास देशभरात वेगाने सुरू केला आहे. या तपासादरम्यान एक अत्यंत धक्कादायक पॅटर्न समोर आला आहे. पुणे, लातूर आणि राज्यातील इतर शहरांमधील अनेक बड्या डॉक्टरांची सध्या सीबीआयकडून कसून चौकशी केली जात आहे. “स्वतःचे हॉस्पिटल पुढे चालवायचे असेल, तर स्वतःच्या मुलाला किंवा मुलीला कोणत्याही परिस्थितीत डॉक्टर बनवावेच लागेल,” ही मानसिकता ठेवून अनेक डॉक्टर पालकांनी लाखो रुपयांची डील करून नीटचा फुटलेला पेपर विकत घेतल्याचा संशय सीबीआयला आहे.

    Maharashtra TimesMumbai-Pune अंतर आणखी कमी होणार! 15 हजार कोटींच्या नव्या एक्स्प्रेसवेमुळे वेळही वाचणार; NHAI ने टाकलं पहिलं पाऊल

    घोटाळ्याचा केंद्रबिंदू पुणे

    दरम्यान, देशभरातील विविध शहरांमध्ये या रॅकेटचे धागेदोरे पसरले असले, तरी या महाघोटाळ्याचा मुख्य केंद्रबिंदू पुणे असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. नक्की कोणाच्या प्रभावाने या संशयास्पद शिक्षकांची नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये नियुक्ती झाली होती? असा प्रश्नही उभा राहतो आहे. सीबीआय आता या संपूर्ण सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यासाठी लातूरमधील काही डॉक्टर, मध्यस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांची कसून चौकशी करत असून लवकरच आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा