• Sat. Jun 6th, 2026
    Mumbai News: फक्त 51 टक्क्यांत पुनर्विकास मंजूर! गृहनिर्माण संस्थांसाठी राज्य सरकारचा गेमचेंजर निर्णय, बदललेले नियम वाचले का?

    Maharashtra Housing society new rules: महाराष्ट्र सरकारने तब्बल सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गृहनिर्माण संस्थांच्या नवीन नियमांना मंजुरी दिली आहे. यामुळे राज्यातील सुमारे १.२५ लाख सोसायट्यांच्या कारभारात डिजिटल प्रशासन, पुनर्विकासातील पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त येणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबई, पुणे, ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी अखेर राज्य सरकारने एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तब्बल ६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था नियमांना’ सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे १.२५ लाख गृहनिर्माण संस्थांच्या दैनंदिन कारभारात आणि नियमांमध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत. नव्या नियमावलीत डिजिटल प्रशासन, पुनर्विकास प्रक्रियेतील पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि सामान्य सभासदांच्या हक्कांवर विशेष भर देण्यात आला आहे.

    २०१९ मध्ये सहकारी कायद्यात दुरुस्ती झाल्यानंतर २०२० मध्ये या नियमांचा मसुदा तयार करण्यात आला होता, मात्र विविध मंजुऱ्यांमुळे तो रखडला होता. अखेर राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी या प्रलंबित सुधारणांना हिरवा कंदील दाखवला आहे.

    ऑनलाईन AGM आणि डिजिटल मतदानाला कायदेशीर मान्यता

    कोरोना काळानंतर अनेक सोसायट्यांमध्ये ऑनलाईन बैठका घेतल्या जात होत्या, पण त्यांना कायदेशीर संरक्षण नव्हते. आता प्रथमच ऑनलाईन आणि हायब्रिड वार्षिक सर्वसाधारण सभांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आता डिजिटल मतदानालाही परवानगी मिळाल्यामुळे परराज्यात किंवा परदेशात राहणाऱ्या सभासदांनाही सोसायटीच्या निर्णय प्रक्रियेत थेट भाग घेता येईल.

    Maharashtra TimesShivraj Motegaonkar: डॉक्टरकीसाठी तंत्र-मंत्र पॅटर्न? तांब्याचं भांडं, गवत अन् थेट ‘AIIMS’ची हमी, मोटेगावकरच्या व्हिडिओनं खळबळ

    पुनर्विकास प्रक्रियेत मोठे बदल

    शहरांमधील सोसायट्यांच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सरकारने नियमात मोठी सवलत दिली आहे. सोसायट्यांना आता त्यांच्या जमिनीच्या मूल्याच्या तब्बल १० पटपर्यंत कर्ज घेता येणार आहे. बिल्डरांकडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी विकासक निवडीची संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ रेकॉर्ड करणे आता बंधनकारक असेल. तसेच, पुनर्विकासासारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आता केवळ ५१ टक्के सदस्यांची सहमती पुरेशी ठरणार आहे.

    वारसांना सभासदत्व हस्तांतरण झाले सोपे

    फ्लॅट धारकाच्या मृत्यूनंतर वारसांचे नाव लावताना होणारे वाद आणि मनस्ताप टाळण्यासाठी, नोंदणीकृत कौटुंबिक सेटलमेंट दस्तऐवजाला मान्यता देण्यात आली आहे. नामनिर्देशित व्यक्तींना वाद मिटेपर्यंत तात्पुरते सभासद म्हणून तत्काळ प्रवेश देण्याची स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे.

    मेंटेनन्स शुल्क आणि आर्थिक शिस्त

    सोसायटीच्या देखभाल शुल्काबाबत अधिक स्पष्टता आणली असून, थकबाकीदार सदस्यांवरील व्याजदर कमी करून दिलासा देण्यात आला आहे. मात्र, यापुढे सिंकिंग फंड, मोठ्या दुरुस्तीचा निधी, शिक्षण-प्रशिक्षण निधी आणि सांस्कृतिक निधी हे सर्व स्वतंत्र बँक खात्यात ठेवणे बंधनकारक असेल, ज्यामुळे पैशांची अफरातफर रोखता येईल.

    याशिवाय व्यवस्थापन समितीतील रिक्त जागा भरण्यासाठी आता निवडणूक प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेण्याची गरज नसून, संस्था अंतर्गत पातळीवर या जागा भरू शकणार आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा