• Sat. Jun 6th, 2026

    कोकणवासियांचा परतीचा प्रवासही त्रासाचा; गाड्या दादर-ठाणे स्थानकांपर्यंतच धावणार, कोणत्या एक्सप्रेसवर परिणाम?

    कोकणवासियांचा परतीचा प्रवासही त्रासाचा; गाड्या दादर-ठाणे स्थानकांपर्यंतच धावणार, कोणत्या एक्सप्रेसवर परिणाम?

    CSMT Railway Station: मे महिना संपत आल्यामुळे कोकणवासियांना मुंबईच्या दिशेने पुन्हा यायला सुरूवात केली असून सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील कामांमुळे अनेक गाड्या दादर आणि ठाण्यापर्यंत धावणार आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: उन्हाळी सुट्टी संपवून कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या कोकणवासींचा परतीचा प्रवास अधिक त्रासाचा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे सुरू असलेल्या फलाट विस्तार आणि पुनर्विकासाच्या कामांमुळे मध्य रेल्वेने कोकणमार्गावरील काही गाड्यांचे अंशतः रद्दीकरण २९ मेपर्यंत वाढवले आहे. त्यामुळे तेजस एक्स्प्रेससह काही महत्त्वाच्या गाड्या सीएसएमटीऐवजी दादर किंवा ठाणे स्थानकांपर्यंतच धावणार आहेत. आधीच कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या चार ते पाच तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. त्यात अंशतः गाड्या रद्द करण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

    मोठ्या बॅगांसह लोकल प्रवास

    कन्फर्म तिकीट न मिळणे, गाड्या विलंबाने धावणे यांमुळे मजल दरमजल करत कोकणवासी गावी पोहोचला होता. आता मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाल्याने कोकणवासी मुंबईतील घराकडे परतत आहेत. मात्र या प्रवासातही अडचणींचा डोंगर त्यांची पाठ सोडायला तयार नाही. तेजससह मांडवी, कोकणकन्या, जनशताब्दी यांसह अन्य गाड्या तासन् तास विलंबाने धावत आहेत. काही प्रवाशांना रेल्वे स्थानकात उतरून उपनगरात जायचे असल्याने त्यांची अधिकच कोंडी झाली आहे. दक्षिण मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांना मोठमोठ्या बॅगांसह लोकलने प्रवास करताना गर्दीचा त्रासही सहन करावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले यांच्यासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अधिक गैरसोय होत आहे. अनेकांना टॅक्सीचा पर्याय स्वीकारावा लागत असल्याने आर्थिक भारही सहन करावा लागत आहे. प्रवासाचा वेळ आणि प्रवास खर्च दोन्ही वाढत आहे. त्यात आता काही गाड्या केवळ दादर आणि ठाण्यापर्यंतच धावणार असल्याने कोकणवासींची दमछाक होणार आहे.

    Maharashtra TimesMega Block News : येत्या रविवारी मध्य रेल्वेच्या ‘या’ तीन स्थानकांवर थांबणार नाही ट्रेन

    गाडी क्रमांक २२१२० मडगाव जंक्शन मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंतच धावेल. गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू जंक्शन-मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंतच धावणार आहे. तसेच, तेजस एक्स्प्रेसची दादर ते सीएसएमटी आणि मंगळुरू एक्स्प्रेसची ठाणे ते सीएसएमटी ही सेवा रद्द राहणार आहे. विशेष म्हणजे, तेजस एक्स्प्रेसला दादरपर्यंतच चालवण्याचा हा पहिलाच निर्णय नाही. यापूर्वी १ फेब्रुवारीपासून सीएसएमटी पुनर्विकासासाठी फलाट क्रमांक १६ आणि १७ वर मोठा ब्लॉक घेण्यात आला होता. त्या काळातही तेजससह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या दादर किंवा ठाण्यापर्यंतच मर्यादित करण्यात आल्या होत्या. आता त्याच व्यवस्थेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

    ‘मुंबईतून कोकणात जाण्याचा प्रवास अडचणीचा ठरला होता, आता परतीचाही प्रवास तितकाच त्रासदायक झाला आहे. कोकण आणि मध्य रेल्वेच्या गाड्या वेळेवर केव्हा धावणार?, असा संतप्त प्रश्न प्रवासी नीलेश सावंत यांनी उपस्थित केला.

    Maharashtra TimesBandra Terminus Metro: ‘मेट्रो-११’चा वडाळा ते वांद्रे विस्तार; गरीब नगर येथील अतिक्रमणमुक्तीनंतर हालचाली, भुयारी मेट्रोने प्रवास वेगवान होणार

    सीएसएमटीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती

    सीएसएमटीच्या सुमारे २,४५० कोटी रुपयांच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत स्थानकाला आधुनिक स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. नव्या प्रवासी सुविधा, उन्नत डेक, कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा आणि वारसा वास्तूचे संवर्धन अशी विविध कामे या प्रकल्पात केली जात आहेत. फलाट विस्ताराच्या कामांमुळेच अंशतः रद्दीकरणाचा कालावधी वाढवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा